बीड, (रिपोर्टर)ः- बीड जिल्ह्यातला जातीय दुरावा संपवून बीडला पुन्हा विकासाच्या वाटेवर देण्याचे काम करावे लागेल. कुठल्याही कार्यकर्त्याला पक्षात घेतांना त्याचा रेकॉर्ड तपासा, चुकीचे लोक आपल्या सोबत घेवू नका, निव्यसनी रहा, साधु संतांचे विचार आचरणात आणा असे सांगत उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी बीड जिल्ह्याच्या विकासाचा एक प्रकारे रोड मॅप तयार केला. राख, वाळू, भुखंड गँग सुता सारखं सरळ करणार असल्याचे सांगून चुकीचे काम करणार्या कंत्राटदाराला थेट काळ्या यादीत टाकणार ज्या कामांची तक्रार आली आहे, ती कामे पथक पाठवून तपासणार असे म्हणत जेव्हा आपल्या आवती भोवती चुकीच्या प्रवृत्तीचे लोक येतात त्यांची एखादी गोष्ट आपण लाइटली घेतली तर त्याची जबर किंमत पक्षाला आणि नेतृत्वाला मोजावी लागते. पक्षाच्या प्रवक्त्यांनी तोलून मापून बोलावे असा सज्जड दमही उमपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी आज प्रवक्त्यांना दिला.

ते बीड येथे आयोजित यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामधील पक्षाच्या युवा संपाद मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपिठावर पक्षाचे सरचिटणीस माजी आ. अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस राजेश्वर चव्हाण, आ. प्रकाशदादा सोळंके, आ. विक्रम काळे, आ. विजयसिंह पंडित, माजी आ. बाळासाहेब आजबे, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, माजी आ. संजय दौंड, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोनवणे, जयसिंह सोळंके, कार्यक्रमाचे आयोजक बबन गवते, बळीराम गवते आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना अजितदादा पवार म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये युवकांनी आपला उत्साह दाखवावा. अंग झटकून काम केले पाहिजे. स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मध्यंतरी बीडमध्ये काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे बीडची बदनामी होत आहे. ही बदनामी आता थांबली पाहिजे. एकमेकांतला दुरावा संपुष्टात आला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. कधीही बेरजेचे राजकारम करायला हवे. 20 राजकारण असायला हवं आणि 80 टक्के समाजकारण व्हावं मात्र तसं दिसून येत नसल्याची खंतही व्यक्त केली. जिल्ह्यात वाळू, राख व भूमाफियांनी उच्छांद गाठला असल्याचे समोर आले आहे. या माफियांना सुतासारखे सरळ करणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

बीडमध्ये रेल्वेचं काम किती वर्षे चाललं आहे, हा प्रश्न बीडकरांनी स्वत:ला विचारला पाहिजे. बीडमध्ये रेल्वे यायला इतका विलंब झाला, त्याला जबाबदार कोण? कोणीतरी याची नैतिक जबाबदारी घेतली पाहिजे. कोणीतरी येणार आणि जादूची कांडी फिरवून काम करणार, असं होत नसतं. त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. मी आता माझ्या एका अधिकार्याची नेमणूक केली आहे. मंत्रालयातही सेक्रेटरी लेव्हलचा माणूस नेमला आहे. या माध्यमातून पाणी, वीज, बीडमधील राष्ट्रीय महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, विमानतळ यावर देखरेख ठेवली जात आहे. मी आता बीडमध्ये इनक्युबिशन आणि इनोव्हेशन सेंटर सुरु करण्याच्या विचारात आहे. या माध्यमातून बीड जिल्ह्यात 200 कोटींची गुंतवणूक येईल. त्यापैकी 165 कोटी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून आणणार आहे, 35 कोटी राज्य सरकारकडून आणण्याचा माझा प्रयत्न सुरु आहे. या सेंटरमध्ये बीडमधील तरुण-तरुणींना नवीन प्रशिक्षण द्यायचं आहे. आता कॉमर्स आणि आर्टसच्या डिग्रीला तितकसं महत्त्वं उरलेलं नाही. आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्स क्षेत्रातील संधी वाढल्या आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले. बीडला विमानतळाची गरज आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटीबद्ध आहोत. काही अधिकारी व कर्मचारी लोकांची कामे करत नाहीत. त्यांच्या तक्रारी येत आहे. अशा अधिकार्यांची अरेरावी खपवून घेतली जाणार नाही. बहुतांश कर्मचारी अनेक वर्षांपासून जिल्ह्यात ठाण मांडून बसले आहेत. त्यांना देखील बदलावे लागणार आहे. रस्त्याची कामे घेतल्यानंतर ती व्यवस्थित झाली पाहिजेत. कामे झाली नाही तर त्याला मातीत घातले पाहिजे. बीड जिल्हावासियांना माझ्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. पुढच्या वेळेस आल्यानंतर वैचारिक मंडळींची बैठक घेऊन त्यांच्या काही संकल्पना काही सूचना आपण ऐकूण घेणार आहोत. बीडच्या रेल्वेचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागलेला नाही. हे काम आजपर्यंत का रखडले? कुठलेही काम करून घेण्यासाठी त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. दरम्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक बळीराम गवते यांनी केले तर आभार बबनराव गवते यांनी मानले. या मेळाव्याला हजारो युवक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
दादा हेलिपॅडवर उतरले
एसपी, कलेक्टरांना धार्यावर धरले
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडवर लॅड झाले. त्याच क्षणी कार्यकर्त्यांचा मोठा जथ्था अजित पवारांना दिसला. शिस्तबध्द अजित पवारांना ते खटकलं. थेट अजितदादांनी एसपींना सवाल केला. एवढे कार्यकर्ते सोडले कसे ? असे म्हणत त्यांनी एसपींना झाप झाप झापलं… पुढे दादांनी कलेक्टर अविनाश पाठक आणि सीओ आदित्य जिवने यांच्याकडे वळवला. मी तुम्हाला चार तास देतोय, या चार तासात मी ज्या सचिवांना सोबत आणलं आहे त्यांना मी सर्व काही सांगितलं आहे, ते जे मुद्दे तुमच्या समोर मांडतील त्याची इत्यनभुत माहिती दिलीच पाहिजे, सॉरी, माफ करा, नंतर देतो हे ऐकून घेणार नाही. माहिती दिली नाही तर कोणाचीही गय केली जाणार नाही असं म्हणत अजितदादांनी सलामीलाच जिल्ह्यातले प्रमुख अधिकारी शिंगावर घेतले.
शेतीत एआयचा वापर केल्यास उत्पन्नात प्रचंड वाढ: अजित पवार
शेतकर्यांनी आर्टिफिशिल इंटेलिजन्सचा वापर शेतीत केला पाहिजे. फळबागांमध्ये जास्त उत्पन्न घ्यायचे असेल तर एआयच्या वापराशिवाय गत्यंतर नाही. बारामतीमध्ये याचं एक प्रात्यक्षिक झालं. त्याठिकाणी 60 टन उत्पादन होणार्या शेतात ऊसाचं उत्पादन 90 ते 100 टनांवर गेले. पारंपरिक पद्धतीने ऊसाला खत टाकताना बरेसचे खत ऊसाच्या पात्यांमध्ये अडकते. तर कधीकधी ऊसाला एवढे पाणी दिले जाते की, जमीन क्षारयुक्त होऊ जाते. मात्र, एआयच्या वापरामुळे पाण्याची आणि खताचा योग्य वापर करता येतो. जमिनीला जेव्हा पाण्याची आणि खताची गरज असते तेव्हा एआय शेतकर्याच्या मोबाईलवर मेसेज पाठवते, असे अजित पवार यांनी सांगितले.
शिक्षकांकडून दादांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या आठ दिवसापासून आंदोलनाला बसलेल्या विना अनुदानित शिक्षकांनी आज अचानक उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. प्रचंड घोषणाबाजी करत हे शिक्षक रस्त्यावर बसले. पोलीस यंत्रणेने त्यांना बाजुला केले. मात्र अजित पवारांनी उपस्थित पोलिसांना यातील तीन शिक्षकांना चर्चा करण्याबाबत यायचे असेल तर त्यांना राष्ट्रवादी भवनात येवू द्या असे म्हंटले.
दादा स्पष्ट बोलले
आई-बापाच्या पाया पडा आमच्या काय पाया पडता
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा हे स्पष्ट बोलण्याबाबत सुपरिचित आहेत. आज युवकांच्या संवाद मेळाव्यात दादांनी चौफेर भाष्य केले. आमच्या पाया पडू नका, आता एकही नेता पाया पडण्याच्या लायकींचा राहिला नाही. आई वडीलांच्या, साधु संतांच्या पाया पडा. त्यांचे विचार आचरणात आणा, राम-राम, नमस्कार, अस्सलाम वालेकूम म्हणत एकमेकांना हात जोडा असेही दादांनी म्हंटले.
गवते यांचे अजितदादांनी केले कौतूक
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा भव्य दिव्य मेळावा बळीराम गवते यांनी आयोजित केला होता. या मेळाव्याला हजारो राष्ट्रवादी युवक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. मेळाव्याचे नियोजन अगदी चोख पध्दतीने करण्यात आले होते. विशेष करून अजितदादांनी अनेक वेळा बळीराम गवते यांचे भाषणात नाव घेवून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
प्रकृती ठिक नसल्याने धनंजय मुंडे गैरहजर
धनंजय मुंडे यांनी एक्सवर पोस्ट लिहीत म्हटलं आहे की, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या आजच्या बीडमधील नियोजित दौर्यात मी पूर्णवेळ उपस्थित राहणार होतो. परंतु, माझी प्रकृती अद्यापही ठीक नसल्याने काल मला उपचारासाठी मुंबई येथे यावे लागले आहे. त्यामुळे बीडमधील आजच्या कार्यक्रमांना मी उपस्थित राहू शकणार नाही, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
दरम्यान, माझ्या अनुपस्थितीबाबत मी पक्ष नेतृत्वाला पूर्वसूचना दिली असून, यासंदर्भात कोणताही संभ्रम निर्माण होऊ नये, अशी माझी विनंती असल्याचंही धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.









