बीड (रिपोर्टर) शेतकर्यांना पिक हातात येईपर्यंत अनेक संकटांचा सामना करावा लागतो. कधी अतिवृष्टीमुळे शेतकर्यांचे पिक हातचे जाते तर कधी पाऊस न पडल्यामुळे हातचे पिक गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतो. त्यामुळे ज्या शेतकर्याने आपल्या पिकाचा विमा भरला आहे. असा शेतकरी विमा संरक्षणापासून वंचित न राहू देण्यासाठी कृषी आणि महसूल विभागाच्या शेतकर्यांनी पिक कापणी प्रयोग समजून घ्यावे. असे प्रशिक्षणात कृषी विभागाच्या सहसंचालकाचे अधिकारी जोशी यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या सभागृहामध्ये विमा कंपनी, कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिक कापणी प्रात्यक्षीक कार्यशाळा आयोजीत केली होती. या कार्यशाळेत सर्व विभागाच्या अधिकार्यांना मार्गदर्शन करताना शेतकर्याची पिक कापणी कधी केली पाहिजे? त्याचे नुकसान कसे मोजले पाहिजे? त्याची पध्दत काय? त्याची सविस्तर माहिती जोशी यांनी कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या अधिकार्यांना दिली. प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकार्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये काही ठराविक मोजके पिक कापणीचे प्रयोग करून तसा अहवाल विमा कंपनीला सादर करायचा असतो. सादर केलेला अहवाल आणि प्रत्यक्ष शेतकर्याचे झालेले नुकसान, नुकसान झालेल्या शेतकर्यांनी आपल्या नुकसानीच्या फोटो आणि कृषी विभागाचा पंचनामा या बाबी अद्यावत स्वरूपामध्ये विमा कंपनीला पोहोचल्यास विमा भरलेला शेतकरी या योजनेपासून वंचित राहत नाही आणि शेतकर्याचे आर्थिक नुकसान होत नाही. असेही जोशी यांनी यावेळी सांगितले. या पिककापणी प्रात्यक्षिक कार्यशाळेला कृषी विभागाचे अधिक्षक अधिकारी मधुकर साळवे, सर्व पंचायत समितीचे कृषी विस्तार अधिकारी, सर्व तहसिलदार, उपविभागीय अधिकार्याचे नेमून दिलेले अधिकारी या कार्यशाळेला उपस्थित होते. या अधिकार्यासोबतच विमा कंपनीचे अधिकारीही या कार्यशाळेला उपस्थित राहून कशापध्दतीने शेतकर्याच्या नुकसानीचा अहवाल आला पाहिजे आणि कृषी विभागाच्या अधिकार्यांनी शेतकर्यांना कशा पध्दतीने मार्गदर्शन करावे याबाबत सविस्तर माहिती दिली.