तहसिलच्या टॉवरवर चढला संतापलेला शेतकरी
प्रशासनाची उडाली धांदल, घटनास्थळी अग्निशामक दलासह पोलीस अधिकारी, तहसिलदार;तब्बल तीन तास आंदोलन
प्रशासनाने घेतली तात्काळ बैठक
अंबाजोगाई, (रिपोर्टर)ः-बीड जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या ऊर्जा प्रकल्पातून सातत्याने सर्वत्र वाद होतांना दिसून येत आहेत. ऊर्जा प्रकल्पाच्या कंपन्या शेतकर्यांची थेट मुसकट दाबी करत असल्याचे अनेक उदाहरण समोर येत आहेत. आता अंबाजोगाई तालुक्यातही सौरऊर्जा प्रकल्प कंपनीच्या दादागिरीला कंटाळलेल्या शेतकर्याने थेट तहसिल कार्यालयाच्या आवारात असलेल्या टॉवरवर चढून आंदोलन केले. गेल्या 30-40 वर्षापासून कसत असलेल्या गायरान जमिनीपैकी अर्धी जमिन शासनाने संबंधित ऊर्जा प्रकल्पाला दिली. मात्र कंपनी शासनाने दिलेल्या जागे बरोबर शेतकर्यांच्या जागेवरही ताबा करत असल्याने कंटाळलेल्या शेतकर्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्यामुळे तब्बल तीन तास अंबाजोगाई प्रशासनाची दमछाक उडाली होती. घटनास्थळी अग्निशामक दलाबरोबरच पोलीस आणि नायब तहसिलदारांची उपस्थिती होती. लेखी आश्वासनानंतर शेतकरी टॉवरवरून खाली उतरला.
अंबाजोगाई तालुक्यातील जळगाव येथील शेतकरी नवनाथ हारे यांनी आज हे आंदोलन केले. जळगाव परिसरातील 31 एक्कर गायरान जमिन ही गेल्या कित्येक वर्षापासून नवनाथ हारे व अन्य शेतकरी कसत होते आणि आपली उपजिविका भागवत होते. यातील 16 एक्कर जमिन ही गंगामाऊली शुगर मिलच्या सौरऊर्जा प्रकल्पाला शासनाने लिजवर दिली. या प्रकरणी गेली महिनाभर या भागातील शेतकर्यांनी आंदोलन केले.
प्रशासनाने संबंधित आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. हे आंदोलन तब्बल 102 दिवस चालले होते.प्रशासन शेतकर्यांच्या बाजुने न राहता कंपनीच्या बाजुने उभा राहत असल्याचे पाहून कंपनीच्या अधिकार्यांची मुजोरी वाढली अन् त्यांनी शासनाकडून लिजवर घेतलेल्या 16 एक्कर जमिनीबरोबर कंपनी शेतकर्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनीवरही बळजबरीने ताबा करू लागली. अखेर आज पहाटे 6.00 वा.च्या सुमारास नवनाथ हारे हा शेतकरी तहसिल परिसरातील टॉवरवर जावून चढले. ही माहिती प्रशासकीय अधिकार्यांना झाल्यानंतर घटनास्थळी नायब तहसिलदारांनी 8 वाजता धाव घेतली. यावेळी अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. पोलीस अधिकार्यांनीही घटनास्थळी तळ ठोकले. शेवटी तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर लेखी आश्वासन मिळाल्याने नवनाथ हारे हे टॉवरवरून खाली उतरले. 11 वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये या बाबत ऊर्जा कंपनीचे अधिकारी प्रशासन आणि शेतकरी यांच्यात बैठक झाल्याचे सांगण्यात येते. हे आंदोलन सुरू असतांना नायब तहसिलदार देशपांडे, स्मिता बाहेती, पोलीस उपनिरिक्षक विनोद घोळवे हे घटनास्थळावर उपस्थित होते.