
बीड, (रिपोर्टर)ः- बीडमधील साक्षी कांबळे या तरुणीने छेडछाडीला कंटाळून धाराशिवमध्ये मामाच्या घरी जाऊन गळफास लावून आत्महत्या केली. साक्षीच्या आईने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देताच उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी मंगळवारी बीडमध्ये येऊन कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर बुधवारी धाराशिवचे पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्याकडून तपास काढून घेत तो कळंबचे उपविभागीय अधिकारी संजय पवार यांच्याकडे दिला आहे. तसेच राठोड यांची चौकशी लावल्याचीही माहिती आहे.
साक्षी कांबळे (वय 20, रा. बीड) या मुलीने बीडमधीलच अभिषेक कदम याच्या त्रासाला कंटाळून 14 मार्च रोजी धाराशिव येथे मामाच्या घरी आत्महत्या केली. याच मुलीचा विवाह 20 एप्रिल रोजी होणार होता. 19 एप्रिल रोजी आई कोयना विटकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र देऊन न्याय देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मंगळवारी उपसभापती नीलम गोर्हे यांनी कोयना यांची भेट घेतली. त्यानंतर डॉ. गोर्हे यांनी या प्रकरणात डीवायएसपी राठोड यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर बुधवारी लगेच राठोड यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला.





