अनुदान, पीएम किसानचे पैसे विसरा
फार्मर आयडी काढण्यासाठी जिल्हाधिकारी थेट वासनवसाडी ग्रा.पं. कार्यालयात
दोन तास बसून शेतकर्यांचे फार्मर आयडी काढले
एसडीएम, तहसीलदारांसह सोबत होता महसूल विभागाचा फौजफाटा
बीड (रिपोर्टर): फार्मर आयडी काढणे महसूल विभागाने कंपल्सरी केले आहे. फार्मर आयडीशिवाय आता शेतकर्यांना कुठलाही लाभ मिळणार नाही. त्यासाठी प्रत्येक गावपातळीवर महसूल विभागाकडून जनजागृती केली जात आहे. आज नवनिवयुक्त जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीडपासून काही अंतरावर असलेल्या वासनवाडी ग्रामपंचायतीला भेट देऊन तेथील काही शेतकर्यांच्या फार्मर आयडी काढून घेतल्या. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या सोबत एसडीएम सह महसील विभागाचा फौजफाटा उपस्थित होता.
केंद्र शासनाने शेतकर्यांना कोणत्याही योजनेचा लाभ द्यायचा असेल तर अॅग्रीस्टॅक फार्मर आयडी काढणे बंधनकारक केले आहे. गेल्या एक वर्षापूर्वी देशातील फक्त सात जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविली होती. या प्रायोगिक तत्वावरील योजनेसाठी बीड जिल्ह्याचीही निवड केली होती. त्यात जवळपास तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी साडेतीन लाख शेतकर्यांपैकी 80 शेतकर्यांच्या फार्मर आयडी काढल्या होत्या. जॉन्सन यांनी बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारल्यानंतर सुरुवातीला सर्वात जास्त पिचलेल्या लाभार्थ्यांकडे आपल्या कामाचा खाक्या वळवत आपण कोणत्या दिशेने काम करत आहोत याची चुणूक दाखविली होती. त्यात श्रावणबाळ, संजय गांधी व निराधारांच्या योजनेचा आढावा घेत त्या कामाला गती देण्याचे प्रशासनाला आदेशीत केले होते. त्यानंतर त्यांनी सर्वात महत्वाच्या अशा शेतकर्याच्या प्रश्नाकडे लक्ष वळवत आज सुट्टीच्या दिवशी उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसीलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी आणि तलाठी या सर्वांचा फौजफाटा सोबत घेत वासनवाडी ग्रामपंचायतमध्ये गावातील सर्व शेतकर्यांना बोलवत फार्मर आयडी काढण्याची प्रक्रिया सुरू केली. शेतकर्यांचा पीकविमा, अतिवृष्टीचे अनुदान, पीककर्ज व शेतीवरच्या सर्व योजना या फार्मर आयडीशिवाय मिळणार नाही हीही बाब गांभीर्याने घ्यावी, तेवढ्याच गांभीर्याने ही बाब जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी घेतली असून त्यांनी वासनवाडीच्या शेतकर्यांसोबतच जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांनी आपला फार्मर आयडी काढून घेण्याचे आवाहन केले आहे.
गावोगावी जावून तलाठ्यांनो फार्मर आयडी काढून घ्या
शेतकरी हा सर्वच बाजुने पिचलेला असून त्याला कोणत्याच शासकीय योजनांचे फारसे ज्ञान असतात, बँकाही शेतकर्यांना जवळ करत नाहीत, सरकारी अधिकारीही शेतकर्यांना सन्मान देत नाहीत, त्यामुळे तलाठ्यांनी व्हॉटस्अॅपवर फार्मर आयडीची माहिती टाकण्याऐवजी आणि गावातील एखाद्या ग्रामपंचायतच्या ऑपरेटरला हाताशी धरत त्याच्यामार्फत माहिती देऊन उंटावरून शेळ्या राखण्यापेक्षा गावात जावून या फार्मर आयडीबद्दल शेतकर्यांना जागृत करावे.