
बीड (रिपोर्टर): बीडच्या साक्षाळपिंपरी येथील शेतकर्यांच्या विहिरीतील पाणी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. सहा टँकर पाणी कुणीतरी पळवल्याने भर उन्हात गुरांना पाणी कोठून आणायचं? असा प्रश्न शेतकर्याने उपस्थित केला आहे. याशिवाय शेतीत लावलेली आंब्याची झाडं पाण्यावाचून करपण्याची शक्यता आहे.
आजवर आपण सोनं-चांदी, पैसे चोरीला गेल्याचे ऐकलं असेल. पण बीडच्या साक्षाळ पिंपरी गावात त्रिंबक काशीद नामक शेतकर्याच्या विहिरीमधील चक्क सहा टँकर पाणी चोरीला गेलं आहे. जिल्ह्यामध्ये भयंकर दुष्काळ आणि पिण्याच्या पाण्याची भासत असलेली टंचाई या अनुषंगाने त्रिंबक काशीद या शेतकर्याने गेल्या दोन महिन्यांपूर्वी आपल्या शेतातील असलेल्या विहिरीमध्ये अडीच परस पाणी साठवून ठेवलं होतं.
हे पाणी त्यांच्या गुरा-ढोरांसाठी त्याचबरोबर त्यांनी वीस गुंठ्यामध्ये आंब्याचे झाड लावले आहेत, ते जगवण्यासाठी साठवून ठेवलं होतं. मात्र पाणी चोरण्याचा उद्योग काही चोरट्यांनी केला आहे. तसेच काही पाणी शेतामध्ये वाया घालवले आहे.शेतकरी त्रिंबक काशीद व पत्नी रंभा काशीद हे दोन दिवस आपल्या नातेवाईकांकडे लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. याचाच फायदा घेऊन हे कृत्य केल्याचं त्यांनी सांगितलं आहे. घटना घडल्यानंर महिला शेतकर्याला अश्रू अनावर झाले होते. जाणून-बुजून कोणीतरी खोडसाळपणा केल्याचा शेतकर्याचा आरोप आहे. ”मला पाणी मागितलं असतं तर आम्ही दिला असतं. मात्र कोणीतरी जाणून-बुजून हे केलं आहे. आमचे जनावर त्याचबरोबर आंब्याची झाडं आम्ही जगवायची कशी? असा प्रश्न रंभा काशीद यांनी उपस्थित केला. संबंधित पाणी चोरणार्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.








