आधी एकासोबत पुन्हा दुसराही गाठला
बीड (रिपोर्टर) : महाराष्ट्रात अविवाहीत तरूणांची संख्या मोठी असून लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण होवुन बसले आहे. याच संधीचा गैरफायदा उचलत तरूणांना लग्नाचे अमिष दाखवत लग्नाचा बनाव करून पैसे उकळले जातात. समाजात बदनामी होईल, म्हणून फसवणूक झालेला परिवार तक्रार करीत नाहीत. हा महाराष्ट्रातील एक ज्वलंत विषय बनला आहे. आष्टी शहरातील एका अविवाहीत तरूणाला अशाच प्रकारे लग्नाचा बनाव करून त्याच्या वडिलांकडून 5 लाख रूपये उकळणा-या टोळीला आंभोरा पोलीस ठाण्यातील पथकाने गजाआड केले आहे.
यातील आरोपी क्र 1) लक्ष्मण साहेवराव जगताप 2) विष्णु मसु कुर्हाडे दोन्ही रा. कापसी ता. आष्टी जि.बीड 3) ज्योती पाटील रा. वाघोली पुणे यांनी मुलाच्या वडिलांकडून 5,70,000/- रुपये घेवुन मुलगा राम यास लग्नासाठी मुलगी दाखवली व आरोपी क्र 4) निकीता हिचे सोबत दि.16.03.2025 रोजी व आरोपी क्र 5) अश्विनी हिच्या सोबत दि.11.05.2025 रोजी मुलाच्या वडिलांकडून पैसे घेवुन लग्न लावुन दिले. नंतर या दोन्ही मुली विश्वास घात करुन पळुन गेल्या. तसेच मुलाच्या वडिलांना आरोपी लक्ष्मण जगताप, विष्णु मसु कुर्हाडे यांनी लाथा बुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ करुन जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या यावरून आरोपींवर गुरनं. 220/2025 कलम 318 (2), (3), (4). 351(2), 352,3 (5) भा न्या. सं. नुसार आंभोरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुला-मुलींच्या आई-वडिलांनी समोरच्यांची खात्री करूनच लग्न लावले पाहिजे. अशा प्रकारे घाईगडबडीत लग्न लावून देणार्यांपासून नागरिकांनी सावध राहायला हवे. असे काही एजंट असल्यास पोलिसांशी संपर्क करावा.








