
बालेपीर भागात तीन महिन्यांपासून पाण्याची बोंब
बीड (रिपोर्टर): भर उन्हाळ्यात बिंदूसरा धरण भरलेले असताना केवळ बीड नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे आणि मुख्याधिकारी अंधारे मॅडम यांच्या अक्षम्य दुर्लक्षपणामुळे बीड शहरातल्या बालेपीर भागात गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे. बालेपीर भागातल्या वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये पाणी येत नसल्याची ओरड होत असून नगरपालिकेचे सध्याचे कामकाज पाहता लोकांना त्रास देणे एवढेच काम अधिकारी – कर्मचारी करताना दिसून येत आहेत. जिथे दोन पैशे मिळतात तिथे मात्र हे अधिकारी – कर्मचारी आपले कुकर्तव्य बजावतात. बालेपीर भागात तात्काळ पाण्याचे वितरण सुरळीत करावे, अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी बीड शहरात ज्या पद्धतीने पाणीपुरवठा व्हायचा, मराठवाड्यात नव्हे तर राज्यात त्याचे कौतुक केले जायचे. अवघा मराठवाडा पाण्यासाठी आसुसलेला असताना बीड शहरात मात्र पाण्याचे वितरण अत्यंत सुरळीत असायचे. मात्र गेल्या दोन वर्षापूर्वी बीड नगरपालिकेची जबाबदारी मुख्याधिकारी म्हणून नीता अंधारे यांच्याकडे गेली तशी बीड शहरात लोकांना मुलभूत गरजांपासून वंचीत राहावे लागले. अवैध बांधकाम यासह अन्य मलिद्याची कामे बंद खोलीत यथायोचीत पार पडतात मात्र लोकांच्या मुलभूत गरजा भागवण्यात अंधारे मॅडम पुर्णत: अपयशी ठरल्या आहेत. भर उन्हाळ्यात बिंदुसरा धरण पुर्ण तापीने भरलेला आहे. माजलगाव बॅक वॉटरचे पाणी बीडसाठी उपलब्ध आहे, असे असताना बालेपीर भाग गेल्या तीन महिन्यांपासून तहाणलेला आहे. या भागात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. अनेक दिवस या भागात पाणीच येत नाही. नगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराविरोधात नागरीकांत प्रचंड संताप असून बालेपीर भागातला पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.








