गणेश सावंत
मो. नं. 9422742810
शिर्षक वाचून अनेकांना आश्चर्य वाटलं असेल. शिर्षकातले वर्म समजून घेण्यासाठी 2019 पासून महाराष्ट्रात सुरू असलेलं विविध पक्षांचं राजकारण समजून घेण्यापेक्षा उमजून घ्यावं लागेल. महाराष्ट्राच्या विचाराला हरताळ फासण्यापासून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वस्त्रहरण करण्यापर्यंत सर्वच पक्षांच्या नेतृत्वांनी आपले राजकीय चारित्र्य या कालखंडात दाखवून दिले आहे. अठरापगड जातींना सोबत घेऊन जाणारा सर्वधर्म समभावचा जयजयकार करत एकतेचा नारा अखंड देशाला देणारा महाराष्ट्र आज राजकारण्यांच्या छक्के-पंज्यामध्ये जखडून गेल्याचा दिसून येते. वरुण रांगडा आणि अंत:करणात ओलावा असलेल्या महाराष्ट्रात जेव्हा नेतृत्व करणारेच निब्बर अन् सोंगाडे दिसून येतात तेव्हा नेतृत्व करणार्यांच्या अंगी बांगड्या परिधानाचा गुण आला, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. गेल्या तीन वर्षांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य छोटे-मोठे पक्ष ज्या पद्धतीने महाराष्ट्रातील जनतेला वार्यावर सोडून केवळ वैयक्तिक सत्ता केंद्रासाठी कुठेही निजण्याचा सपाटा ठेवतात तेव्हा
चारित्र्यवान कोण?
हा सवाल उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. पारंपारिक युती असलेल्या शिवसेना-भाजप यांची इ.स. 1995 साली महाराष्ट्रात पहिल्यांदाच सत्ता आली. तोपर्यंत काँग्रेस आणि काँग्रेसचा पोटपक्ष राष्ट्रवादी यांनी महाराष्ट्र हाकला, त्यानंतर पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. सत्तेचे रगत तोंडाला लागलेल्या भाजप-शिवसेना यांनी युती तोडली आणि पुन्हा सत्तेसाठी युती केली. मात्र 2019 च्या निवडणुकीत मुख्यमंत्री कोण? या मुद्यावरून भाजप आणि शिवसेनेचं बिनसलं अन् पहाटेच्या कोंबडबाग वेळेस भाजपा आणि राष्ट्रवादीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले. अवघ्या काही तासांचे हे सरकार उभ्या देशाने पाहिले. विचारांचे दोन टोक पुन्हा दुरावले अन् महाराष्ट्राला पुन्हा अवैचारिक एकमेकांच्या विचारांची संहिता नसणारे शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचे सरकार महाराष्ट्रात आले. दोन-अडीच वर्षांच्या कालखंडात महाआघाडी सरकार म्हणून त्यांनी राज्यही चालवलं, मात्र ‘घर घर मे है रावण इतने राम कहाँ से लाऊ’ या प्रश्नात अडकलेल्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसांना अवघ्या तीन वर्षात तिसर्यांदा सत्तांतर घडत असल्याचं चित्र आणि मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’चं वस्त्रहरण महाराष्ट्राच्या राजकीय सारीपाटावर होताना दिसलं. शिवसेना पक्षातली अर्ध्यापेक्षा जास्त शिवसेना आघाडीतून बाहेर पडली आणि भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांना मिठी मारत पुन्हा वर्षा बंगल्यावरच्या बेडरुममध्ये सेज सजली. या तीन वर्षांच्या कालखंडात तीन वेळा सत्तांतर झालेल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा विचार काय? महाराष्ट्राची संस्कृती काय? समाज सुधारकांसह साधू-संत-सुफींनी दिलेल्या त्या दिशांचं काय? शेतकर्यांच्या प्रश्नांचं काय? आरोग्य आणि शिक्षणाचं काय? महिलांवरील अत्याचाराबाबत काय? बेरोजगारी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं काय? महागाईचं काय? या काय असलेल्या प्रश्नांचं या तीन वर्षांच्या कालखंडात कार्यक्षमतेत नपुंसक असलेल्या एकाही नेतृत्वाने उत्तर देण्याचं धाडस केलं नाही. ते धडस तरी कसे करणार?
नाही निर्मळ जीवन
काय करील वसंतकाळ
वांझे न होती लेकरे,
काय करील भ्रतारे
नपुंसक नवर्याशी
काय करील बाईल त्याशी
जगद्गुरू संत तुकोबांच्या या अभंगातले सवाल आणि उत्तर जे मर्मभेदक आहेत. ते सवाल आणि उत्तर महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांबाबत आज तंतोतंत लागू होतात. अंत:करणामध्ये केवळ सत्तेची लालसा आहे आणि ती सत्ताही स्वत: पुरती मर्यादीत असल्याने सत्ताकारणाचा कितीही वसंतकाळ आला तरी त्यामध्ये त्यांना तेवढ्यामुळेच यश येत नाही, की जशी एखादी स्त्री वांझ असेल, पुत्र प्राप्तीसाठी तिचा नवराच काहीच करू शकत नाही आणि एखादा नवराच नपुंसक असेल तर पुत्र प्राप्तीसाठी बाई आसुसलेलीच असेल त्याप्रमाणे महाराष्ट्रातील सत्ताकारणाच्या राजकारणात अडकलेल्या चारही पक्षांच्या बावळटपणामुळे विकासाचं, कर्तव्यकर्माचं बाळ महाराष्ट्रात जन्म घेत नाही. याउलट
महाराष्ट्र कसा नासवावा
याचे ध्येय-धोरण जसे सोळाव्या शतकात दिल्लीश्वर आखत होता तसे आजचे दिल्लीश्वरही महाराष्ट्र नासवण्याहेतू आपल्या नुमाईंद्यांना नव्हे तर चमच्यांना महाराष्ट्रात या ना त्या पदावर बसवून साध्य करत आहेत. त्याचे ज्वलंत उदाहरण महाराष्ट्रचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाहितले तर दिसून येतं. गुजराती आणि राजस्थानी महाराष्ट्रातून गेले तर महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या दुबळा होईल. आजोबा असलेल्या भगतसंह यांचं हे वक्तव्य हास्यास्पद आणि महाराष्ट्र श्रीमंत आहे, विचाराने आणि अर्थकारणाने मालामाल आहे, म्हणून तुम्ही इथे आलात. गुजरात आणि राजस्थान श्रीमंत असते तर गुजरातचं शहर अथवा राजस्थानचं शहर मुंबई केव्हाच झाले असते. हे साधं गणितही या आजोबांना समजत नाही! याचं अर्थ महाराष्ट्राला अस्थिर करणं, महाराष्ट्राला बदनाम करणं आणि महाराष्ट्राच्या सत्ता सोहळ्यात आपलच वर्चस्व राहणार हा जो ध्येयवाद दिल्लीश्वरांचा आहे तो आता उभ्या महाराष्ट्राने ओळखला. गेल्या तीन चार वर्षांच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रात शेतकर्यांसह कष्टकर्यांबाबत विद्यार्थ्यांसह बेरोजगारांबाबत अथवा इथल्या छोट्या उद्योग-धंद्यांबाबत सरकारने महत्वपूर्ण निर्णय काय घेतले? असा सवाल कोणी विचारला तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सोडा भाजपालाही याचं उत्तर देता येणार नाही. या कालखंडामध्ये महाराष्ट्रात अस्थिरता कशी निर्माण होईल, महाराष्ट्रापासून मुंबई कशी वेगळी केली जाऊ शकेल, विदर्भ कसा वळचळणीला टाकला जाऊ शकेल, मराठवाड्याचं कसं वाळवंट केला जाऊ शकेल आणि पश्चिम महाराष्ट्रातलं लोणी आपल्याला कसं खाता येईल एवढच या भाजपाच्या विचारसरणीने पाहितलं. गेल्या तीन वर्षातल्या कालखंडातल्या महाराष्ट्र नासवण्याच्या इतिहासाबरोबर इथे
सर्रास लोकशाहीची हत्या
केली जात आहे. लोकशाहीच्या या राज्यामध्ये ज्याच्या हाती सत्ता, तो जसा मालकी हक्काने हुकुमशाही चालवतो तीच हुकुमशाही महाराष्ट्रात स्थापन झालेल्या सरकारकडून होताना दिसून येते. लोकाभिमूख सरकारने राज्य चालवणे, जिल्हा चालवणे अपेक्षीत असते, परंतु गेल्या आठ-दहा महिन्यांच्या कालखंडात महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका यावर प्रशासकांचं वर्चस्व आहे, जिथं लोकांनी निवडून दिलेल्या पदाधिकार्यांनी आपला तालुका, जिल्हा चालवायला हवा तिथं नोकरदार वर्ग जिल्हा चालवत आहेत, शहर चालवत आहेत, महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपतींनी स्वराज्य उभं केलं आणि रयतेला समतेचं राज्य दिलं. इथं लोकशाही असताना समतेचं राज्य तर सोडा लोकशाहीत नोकरशाहीचं राज्य येतं आणि त्या राज्यात जनतेला राहावं लागतं. नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची घोषणा केली जाते, पुन्हा निवडणुका पुढे ढकलल्या जातात, पुन्हा घोषणा केली जाते, निव्वळ लोकशाहीचा पोरखेळ करत आजच्या राज्यकर्त्यांनी आणि खासकरून भारतीय जनता पार्टीच्या विचारसरनी लोकशाहीची सर्रास हत्या करताना दिसून येतात. अरे जो महाराष्ट्र लोकाभिमुख नेतृत्वाच्या हाती असायचा, लोकाभिमुख नेतृत्वाला सन्मान देण्यासाठी जिथे महाराष्ट्राच्या सचिवालयाचे मंत्रालय केले गेले तिथे आज भाजपप्रणीत शिंदे सरकारने महाराष्ट्राचा राजकारभार सचिवावर सोपवून सत्ताकारणाच्या राजकारणात महाराष्ट्राला जणू नागवे केले. एकूण आजच्या राजकारण्यांची स्वहित सत्ताकारणाच्या बेरजेत महाराष्ट्राला कापण्याची आणि नासवण्याची जी स्पर्धा चालू आहे ती संताजनक आहे. आज सत्तेचे सुत्र हाती घेऊन वर्षाची उब घेणार्या तथाकथित नेतृत्वांना महाराष्ट्राला उत्तर द्यावं लागेल आणि जेव्हा महाराष्ट्राचं मनगट सळसळतं तेव्हा सळसळत्या मनगटातून क्रांती होते हा इतिहास याच महाराष्ट्राचा.