
बीड, (रिपोर्टर)ः- मराठवाड्यामध्ये आतापर्यंत पावसाचे प्रमाण कमी आहे. जायकवाडी वगळता इतर धरणात पाणी साठा 20 ते 25 टक्के दरम्यान असुन जायकवाडीतला पाणी साठा अधिक असल्याने दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले. यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील 2 लाख 40 हजार हेक्टर खरीप पिकांना फायदा होणार आहे हे पाणी 9 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे.
जायकवाडीच्या धरणामध्ये 77 टक्यांपेक्षा जास्त पाण्याचा साठा जमा झाला. धरणात वरून पाण्याचा ओग सुरूच आहे. मराठवाड्यात मात्र अत्यंत कमी स्वरूपात पाऊस पडल्यामुळे मराठवाड्यातील धरणात म्हणावा तेवढा पाणी साठा जमा झाला नाही. जायकवाडीच्या धरणात मुबलक पाणी असल्याने या धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले. त्यामुळे मराठवाड्यातील पाच जिल्ह्यामध्ये 2 लाख 40 हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणारआहे. डाव्या कालव्याचा छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी जिल्ह्यातील 1 लाख 41 हजार हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे तर उजव्या कालव्याचा छत्रपती संभाजीनगर, बीड, अहमदनगर जिल्ह्यातील 44 हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार आहे. हे पाणी 9 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे.








