
स्थानीक स्वराज्य निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकद उभी करू -खा. सुनील तटकरे
तेव्हा धनंजय मुंडेंची महत्वाची भूमिका होती
बीड, (रिपोर्टर)ः- महाराष्ट्राच्या विकासाचा दृष्टीकोन समोर ठेवून आम्ही एनडीएमध्ये सहभागी झालो. हा निर्णय आमच्या सर्वांचा सामूहिक निर्णय होता. तेव्हा एनडीएमध्ये सामील होताना धनंजय मुंडे यांनी महत्वाची भूमिका बजावली, असे सांगत राष्ट्रवादीचे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्हा हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि सगज जिल्हा आहे. इथला प्रत्येक कार्यकर्ता ज्या पद्धतीने पक्षासाठी काम करत आला आहे त्या पद्धतीने कार्यकर्त्यांच्या निवडणुकीसाठी राज्याची कार्यकारिणी काम करेल. मी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जाणारा आहे. आता स्थानीक स्वराज्य संस्था निवडणुका समोर आल्या आहेत. अशा स्थितीत कार्यकर्त्यांनी बीड जिल्हा हा राष्ट्रवादीसाठी अधिक अधिक मजबूत करावा, अशा आशयाचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.
आमची जी मूळ विचारधारा शाहू-फुले-आंबेडकरांची ती विचारधारा सोबत घेऊन आम्ही एनडीएमध्ये गेलो. त्या वेळी अनेकांनी चुकीचा प्रचार केला, अपप्रचार केला. 2024 च्या निवडणुकांमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलली जाणार, असा अपप्रचार केला त्यामुळे देशभरात इंडिया आघाडीला काही प्रमाणात यश आलं. महाराष्ट्रात महायुतीचे उमेदवार अनेक ठिकाणी पराभूत झाले. मी तेव्हाही सांगितलं आणि आत्ताही सांगतो. चंद्र-सुर्य असेपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची घटना कधीही बदलली जाणार नाही. 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना अनेक अपप्रचार झाले मात्र सत्य सुर्यप्रकाशाइतके स्वच्छ असते. पक्षाचे सर्वेसर्वा अजितदादा पवार हे प्रशासन चालवण्यात कसे आहेत हे उभ्या महाराष्ट्राला माहित आहे. प्रशासन चालवण्याबाबत त्यांचा हातखंडा आहे. अजितदादांनी राज्यातील दोन कोटींपेक्षा अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेत सामावून घेतलं. शेतकर्यांचे विजबील माफ करण्यात आले, अन्य महत्वाच्या योजना अजितदादांनी राबवल्या. हे तुम्हाला माहित आहे.
परंतु आता स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत, तसा बीड जिल्हा हा राजकीयदृष्ट्या संवेदनशील आणि सजग जिल्हा आहे. स्थानीक स्वराज्य संस्था निवडणुकांना सामोरे जाताना पक्ष अधिक अधिक बळकट कसा होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. मी याआधीही सांगत आलो आहे आणि आताही सांगतो, जेव्हा आम्ही एनडीएमध्ये सामील झालो तेव्हा धनंजय मुंडेंनी महत्वाची भूमिका बजावली. बीड जिल्ह्यातल्या सहा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेले आहेत. जय-पराजय होत असतो. कार्यकर्त्यांनी लोकसभा-विधानसभा निवडणुकीत जीव ओतून काम केले. आता कायर्कर्त्यांच्या निवडणुकीत अमाहीही तेवढ्याच ताकतीने त्यांच्या पाठिशी उभे राहू. कार्यकर्त्यांना उघडं पाडणं नव्हे तर त्यांना सोबत घेऊन बळ देण्याचे काम माझे आहे. कार्यकर्त्यांसाठी जागणारा आणि त्यांच्या इच्छा सांभाळणारा मी असल्याचे सांगून हा जिल्हा राष्ट्रवादीचा आहे तो अधिक अधिक कसा बळकट होईल याकडे तुम्ही लक्ष द्या. आता अजितदादा स्वत: या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास तर होणारच आहे. असेही तटकरे यांनी म्हटले. ते बीड येथे आयोजीत निर्धार संवाद मेळाव्या दरम्यान बोलत होते. या वेळी व्यासपीठावर धनंजय मुंडे, विक्रम काळे, रुपालीताई चाकणकर, विजयसिंह पंडित, राजेश्वर चव्हाण, सुरज चव्हाण, बालासाहेब आजबे, संजय दौंड, रमेश आडसकर, आनंद परांजपे, पापा मोदी, तांबोळी, कल्याण आखाडे, बळीराम गवते, जयसिंह सोळंके, योगेश क्षीरसागर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना तटकरे म्हणाले, उत्तर महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतर मी दोन दिवसांपासून मराठवाड्याच्या दौर्यावर आहे. या कालखंडात अनेक ठिकाणच्या जिल्ह्यांमध्ये गेलो, तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांनी पक्षासाठी जेवढ्या ताकतीने काम केले तेवढ्याच ताकतीने कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत पक्ष काम करणार आहे. गेल्या दोन वर्षे आणि पाच-दहा दिवसांपूर्वी आम्ही एनडीएमध्ये दाखल झालो.
तटकरेंनी केली मराठवाड्याची तटबंदी मजबूत
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे हे राज्यभरात कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी निर्धार मेळावा घेत आहेत. उत्तर महाराष्ट्रात त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये उर्जा निर्माण केल्यानंतर आता मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची तटबंदी अधिक मजबूत करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून ते मराठवाड्याच्या दौर्यावर आहेत. संभाजीनगर नंतर बीड त्यांनी निर्धार मेळावा घेतल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पहावयास मिळते.
वैर माझ्याशी, मग मातीची बदनामी का? -धनंंजय मुंडे
खरंतर आज मी बोलणार नव्हतो. भाषण करणार नव्हतो. कारणही सांगायचं नव्हतं. परंतु सांगतो. इथं बोलावं की मैदानात बोलावं. बर्याच दिवसानंतर बोलतोय. न बोलण्याची डबल सेंच्यूरी केली आहे. दोनशे दिवस न बोलता घालवलेत. या दोनशे दिवसात एक गोष्ट जिव्हारी लागली आहे ती म्हणजे बीड जिल्ह्याची बदनामी. ज्याने बदनामी केली त्यांना एवढेच सांगतो. ‘वैर माझ्या सोबत होतं तर मग जिल्ह्याची बदनामी का केली?’ स्थानीक असतील, बाहेरून येऊन बदनामी करणारे असतील, त्यांच्यासाठी एवढच सांगतो. ‘तुम्हारी सोच के साचे में ढल नही सकता, जुबान काटलो, लहजा बदल नही सता, अरे मुझे भी मोम का पुतला समज रहे हो, तुम्हारी लो से ये लोहा पिघल नही सकता’ असे मुंडेंनी बीडची बदनामी करणार्यांना सुनावले.

लाडकी बहिण योजना ही विधानसभेच्या यशात
किंगमेकर ठरली-रूपालीताई चाकणकर
बीड येथील राष्ट्रवादी काँग्रेसपक्ष अजित पवार गटाच्या निर्धार संवाद मेळाव्यात बोलतांना महिला आयोगाच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर म्हणाल्या की, राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी महिन्याला 1500 (लाडकी बहिण योजना) लागू केली. त्या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाला अभुतपुर्व यश मिळाले. हा पक्ष तळागाळातील महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. या लाडकी बहिण योजनेमुळे संसाराला थोडा फार हातभार लागला आहे. विरोधक मात्र या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले होते. विरोधक हे कशासाठी ही विरोध करतात. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा दलित, अल्पसंख्यांकासह महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत महिलांनी या पक्षाच्या पाठीमागे उभे रहावे आणि जि.प. आणि पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकात पक्षाला भरभरून मतदान करावे असे ही यावेळी रूपालाताई चाकणकर यांनी आवाहन केले.








