
महावितरण आणि नगरपरीषद यांची टोलवाटोलवी तर लोकप्रतिनिधींच्या डोळ्यावर झापडं ; जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?
बीड (रिपोर्टर): बीड शहरातील चौकाचौकात आणि रस्त्याच्या कडेला असणारी रोहित्रे हि एखाद्या विद्युत बॉम्ब प्रमाणेच उभी असुन कधी या रोहित्राचा स्फोट होईल सांगता येत नाही. धोकादायक रोहीत्रे किमान 10 अथवा त्यापेक्षा जास्त उंचीवर असणे बंधनकारक असताना 3ते 4 फुट उंचीवर असणा-या रोहित्रांमुळे बीडकरांचा जीव धोक्यात आहे.रोहित्राचा स्फोट होऊन त्यातुन उडालेल्या तेलामुळे रस्त्याने जाणारी मुले भाजल्याच्या घटना घडलेल्या आहेत.महावितरणच्या रस्त्याच्या मधोमध असणा-या धोकादायक डिपी हटविण्यात यावी अशी नागरीकांनी नगर परिषद आणि महावितरणला वारंवार मागणी करूनही प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते.नगरपरीषद महावितरणकडे तर महावितरण नगरपरीषदेकडे बोट दाखवून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न करत आहे. लोकप्रतिनिधींनी डोळ्यावर झापड बांधल्याने त्यांना याचे गांभीर्य दिसून येत नसल्याने एकंदरीतच एखाद्याचा जीव गेल्यावरच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे.
डीपीमध्ये आग लागल्याने स्फोट होऊन शाळकरी मुलांना गंभीर धोका होण्याची शक्यता पण प्रशासनाला गांभीर्य नाही :- उत्तमराव मिसाळ नागरीक बीड
कॅनॉल रोड ते तुळजापूर मध्ये अनेक यशवंतराव विद्यालय, शिवाजी विद्यालय तसेच विविध खाजगी कोचिंग क्लासेस , वसतिगृह या परीसरात आहेत. लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरीकांची वर्दळ असणार्या या परीसरात महावितरणची विद्युत डीपी रस्त्याच्या मधोमध आहे.रस्त्यावरून ये जा करणा-या शाळकरी मुलांना याचा धोका आहे.प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करते असा आरोप येथील रहिवासी उत्तमराव मिसाळ यांनी केला आहे.
एखाद्याचा जीव गेल्यावरच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जाग येणार का? :- डॉ.गणेश ढवळे सामाजिक कार्यकर्ते
बीड शहरात गेल्या 2 वर्षात अनेक ठिकाणी शासनाच्या नगरोत्थान सुवर्ण जयंती योजनेंतर्गत जवळपास 140 कोटी रुपयांच्या सिमेंट क्रांकीट रस्त्यांची व नालींची कामे करण्यात आली. मात्र रस्त्याच्या मध्यभागी व कडेला असलेली उघडी व जमिनीलगत असणारे रोहित्रे आणि पोल हटविण्यासाठी निधीची तरतूद नसल्याने वाहतुकीस अडथळा व अपघाताला निमंत्रण ठरणारी रोहित्र व विद्युतखांब काढण्याची तसदी संबंधित विभागाने घेतली नाही.काही ठिकाणी वीज रोहित्र ऐन वर्दळीच्या ठिकाणी आणि बाजारपेठेतच आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आर्थिंग मधुन करंट, उघड्या तारा ,फ्युजची उघडी पेटी धोक्याचे कारण ठरण्याची शक्यता आहे.सुचना फलक,रक्षक संरचना किंवा सुरक्षा नसल्याने गंभीर अपघाताची शक्यता आहे. यासंदर्भात तक्रारी,निवेदने आणि आंदोलनानंतरही प्रशासनाला जाग येत नसल्याने एखाद्याचा जीव गेल्यावरच लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल डॉ.गणेश ढवळे यांनी केला आहे.
शहरातील धोकादायक रोहित्रे
शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह रोड,तुळजाई चौक,राजीव गांधी चौक, बार्शी नाका,केएसके महाविद्यालय परीसर, बालेपीर,माने काम्प्लेक्स रोड, सुभाष रोड, जालना रोड,जुने एसपी कार्यालय,कंकालेश्वर मंदिर, अण्णाभाऊ साठे चौक, अहिल्यादेवी होळकर पुतळा, बलभीम महाविद्यालय, पंचशील नगर,शाहुनगर, मोमीनपुरा आदी ठिकाणी उघडे रोहित्र आणि त्यात उघडे फ्युज बाक्स, वीज वाहिनी उपकरणे धोकादायक स्थितीत आहेत.
महावितरण आणि नगरपरीषद यांची टोलवाटोलवी, जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न
रस्ता रुंदीकरण करताना रोहित्रे व ईतर विद्युत उपकरणांचे स्थलांतर हे नगरपालिका व बांधकाम विभागाचे काम असल्याचे तर उघड्यावरील उपकरणांच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येईल असे प्रेमसिंग राजपुत्र अधिक्षक अभियंता महावितरण बीड परीमंडळ स्पष्टीकरण देतात.तर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी आंदोलन अनुषंगाने सामाजिक कार्यकर्ते डॉ.गणेश ढवळे यांना दिलेल्या लेखी पत्रात शहरातील रस्त्यांच्या मध्यभागी असलेले रोहित्र व विद्युत पोल महावितरणच्या मालकीचे असल्यामुळे ईतरत्र सुरक्षित ठिकाणी हलवुन नगरपरिषदेला सहकार्य करावे अशा आशयाचे पत्र अधिक्षक अभियंता महावितरण यांना दिले आहे.एकंदरीतच महावितरण आणि नगरपरीषदेच्या भोंगळ कारभार नागरीकांच्या मुळावर आला आहे.









