
बीड (रिपोर्टर): यावर्षी राज्य सरकारने एक रुपयात पीकविमा ही योजना रद्द केल्यानंतर बीड जिल्ह्यातून खरीप हंगामात विमा उतरवणार्या शेतकर्यांची संख्या जवळपास 38 टक्क्यांनी कमी झाली आहे. गेल्यावर्षी 17 लाख 19 हजार 199 शेतकर्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला होता. यावर्षी मात्र त्यात घट होऊन 11 लाख 357 शेतकर्यांनी विमा उतरवला आहे.
विमा कंपन्यांनी एक रुपयात शेतकर्याचा विमा उतरवण्यास नकार दिल्यानंतर राज्य सरकार, कृषी विभाग आणि विमा कंपन्यांनी प्रति हेक्टरी ही रक्कम निश्चित केली. यानुसार सोयाबीनला हेक्टरी 1160 रुपये तर कापसाला 1800 रुपये प्रति हेक्टरी इतकी रक्कम निश्चित केली. त्यामुळे निश्चितच पेरणी आणि खतात आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांनी विमा उतरवण्याकडे पाठ फिरवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी जवळपास 38 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्यावर्षी 7 लाख 78 हजार 355 हेक्टर पिकांचा विमा उतरविला होता. यावर्षी मात्र यामध्ये घट होऊन 4 लाख 77 हजार 563 हेक्टरवर विमा उतरवण्यात आला आहे. येत्या 14 ऑगस्टपर्यंत पीकविमा काढण्याची मुदत आहे. यामध्ये फारकाही क्षेत्र आणि संख्या वाढेल, याची शक्यता कमी आहे, असा अंदाज कृषी विभागाच्या अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.








