
राज्यातले तीन मोठी धरणे भरली
बीड (रिपोर्टर): राज्यामध्ये सर्वदूर पाऊस पडल्याने धरणात पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात वाढला. राज्यातील 2997 धरणात 72.38 टक्क पाण्याचा साठा जमा झाला असून मराठवाडा विभागातील 920 धरणात 58.97 टक्के पाणीसाठा जमा झाला असून राज्यामधील उजनी, कोयना आणि जायकवाडी ही तीन मोठी धरणेही आता पुर्णत: भरली आहेत.
मे, जून, जुलै या दरम्यान राज्यात धो धो पाऊस पडला. या पावसामुळे नद्यांना चांगले पाणी आल्याने धरणातील पाण्याच्या पातळी वाढ झाली. काही धरणे मे महिन्याच्या पावसात अर्धे भरले होते तर काही जून-जुलैच्या दरम्यान भरले आहेत.
राज्यामध्ये लहान-मध्यम व मोठे असे 2997 धरणे असून या धरणात आजस्थितीत 72.38 टक्के पाण्याचा साठा जमा झालेला आहे. कोकण विभागामध्ये 173 धरणात 84.83 टक्के पाणीसाठा जमा झालेला आहे. पुणे विभागातील 720 धरणात 82 टक्के पाणीसाठा आहे. मराठवाडा विभागातील 920 धरणात 58.97 टक्के, अमरावती विभागात 264 धरणात 62.42 तर नागपूर विभागातील 383 धरणात 64.13 टक्के पाणीसाठा जमा झाला. राज्यातील तीन मोठी धरणे पूर्णत: भरली. त्यामध्ये उजनी धरणात 98.88, कोयना धरणात 82 टक्के आणि जायकवाडी धरणात 93.64 टक्के पाण्याचा साठा जमा झाला आहे.








