
बीडमध्ये अल्पसंख्यांक भवनाचा मार्ग मोकळा
शेख तय्यब यांच्या मागणीला हिरवा कंदिल
बीड (रिपोर्टर): अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांसाठी बीडमध्ये अल्पसंख्यांक भवन उभारण्यासाठी मंजुरी व निधी देण्यात यावी, अशा आशयाचे निवेदन काल अल्पसंख्यांक मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य शेख तय्यब यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना दिले. त्यावेळी तात्काळ या प्रस्तावास होकार देत पुढील दौर्यात अल्पसंख्यांक भवन उभारणीसाठी आवश्यक जागेची पाहणी करू, असे आश्वासन दिले. त्यामुळे अल्पसंख्यांक भवन उभारले गेले तर एका छताखाली अल्पसंख्यांक समाजाचे विविध कार्यालये येतील आणि लोकांची कामे एका चक्करमध्ये पुर्णत्वाकडे जातील.

याबाबत अधिक असे की, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे गेली दोन दिवस बीड जिल्हा दौर्यावर होते. त्या दरम्यान अल्पसंख्यांक मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य शेख तय्यब यांनी काल उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. बीड जिल्ह्यातील अल्पसंख्यांक समाजासाठी स्वतंत्र अल्पसंख्यांक भवन उभारण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. सध्या अल्पसंख्यांक समाजाचे विविध कार्यालये आणि संस्था वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या स्थितीत कार्यरत आहेत. यामुळे नागरिकांना सेवांचा लाभ घेण्यासाठी अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे बीड शहरात एक स्वतंत्र अल्पसंख्यांक भवन उभारण्यात यावे, हे भवन उभारण्यासाठी आवश्यक जागा आम्ही स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देऊ, असे शेख तय्यब यांनी निवेदनात म्हटले. निवेदन वाचल्यानंतर अजितदादांनी या प्रस्तावास सकारात्मकतेने घेत होकार दिला आणि पुढील दौर्यात या विषयी जागेची पाहणी करू, असे म्हटले. हे भवन उभारण्यात आलं तर यामध्ये मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय, महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे कार्यालय, उर्दू घर, हज किमिटीचे कार्यालय, जिल्ह्यातील अल्पसंख्यांक कार्यालये एका छताखाली येतील आणि लोकांच्या समस्या संपुष्टात येतील.
दादा म्हणाले, राजुरीवेसचा रस्ता लवकरच होईल
मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे संचालक शेख तय्यब यांनी गेल्या दोन महिन्यांपूर्वी बीड शहरातील राजूरीवेस ते बलभीम चौक सिमेंट रस्ता, नाली बांधकाम आणि डॉ. झाकेर हुसैन मदरसा योजना अल्पसंख्यांक विभागामार्फत बीड जिल्ह्यातील मदरश्यांमध्ये जिल्हा नियोजनच्या माध्यमातून सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याबाबत निवेदन दिले होते. जिल्हा परिषद ते राजूरीवेस आणि राजुरीवेस ते बलभीम चौक हा रस्ता लवकरच केला जाईल. त्याचबरोबर मदरश्यांमध्ये सौरऊर्जा संच बसवण्याबाबतही अजितदादांनी सकारात्मतेने घेत ही दोन्ही कामे लवकर पुर्णत्वाकडे जातील, असे आश्वासन शेख तय्यब यांना दिले.








