मजीद शेख
बीड- राजकारणात बीड माहिर आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, आ. धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, सुरेश धस, आ. सोळंके, ही बडी मंडळी बीडच्या राजकारणात सक्रीय असल्यामुळे बीडकडं राज्याचं लक्ष लागत असतं. सरकार कोणाचं ही असलं तरी बीडला मंत्रीपद मिळत असतं. पंचवीस वर्षाचा राजकीय इतिहास बघितला तर बीडला कोणी ना कोणी मंत्री राहिलेलं आहे. सध्याच्या सरकारचा आज मंत्रीमंडळ विस्तार झाला. यात बीडला कॅबीनेटमंत्री म्हणुन कोणाची तरी वर्णी लागेल असा अंदाज होता. बीडला कोणालाच पहिल्या यादीत स्थान दिले नाही हे पंचवीस वर्षात पहिल्यांदाच होत आहे. राज्यमंत्रीपदाचा शपथविधी येत्या काही दिवसात होणार असून त्यात कोणाची वर्णी लागेल हे नक्की सांगता येत नाही.
बीडमध्ये नेहमीच राजकीय उलथापालथी होत असतात. त्यामुळे बीडचं नाव राज्याच्या राजकारणात नेहमीच घेतलं जातं. स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळे बीड चर्चेत असायचं. स्व. गोपीनाथराव मुंडे यांना 1995 साली राज्याच्या सत्तेत संधी मिळाली होती, ते उपमुख्यमंत्री झाले होते. शिवसेना-भाजपाचं सरकार पहिल्यांदा 95 साली आलं होतं. त्यानंतरच्या काळात ज्या काही निवडणुका झाल्या. त्यात भाजपा, शिवसेना युती मागे पडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचं सरकार सत्तेत आलं. 1999 साली दोन्ही काँग्रेसने मिळून सत्ता मिळवली. त्यावेळी जयदत्त क्षीरसागर यांना कॅबीनेट मंत्री म्हणुन संधी देण्यात आली. 2004 ला स्व. विमलताई मुंदडा ह्या मंत्री होत्या. 2009 ला ही मुंदडाच मंत्री होत्या. जयदत्त क्षीरसागर ही मंत्री होते. 2014 साली राज्यात परिवर्तन झालं. भाजपा, शिवसेनेचं सरकार आल्यानंतर पंकजाताई मुंडे यांना कॅबीनेट मंत्री झाल्या होत्या. 2019 च्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षाची आघाडी झाली. यात धनंजय मुंडे यांना संधी देण्यात आली. आज दिर्घ प्रतिक्षेनंतर मंत्रीमंडळाचा विस्तार झाला. यात बीडमधून पंकजा मुंडे किंवा विनायक मेटे यांना कॅबीनेट मंत्रीपद मिळेल असं वाटत होतं,पण दोघांपैकी कोणालाच संधी मिळाली नाही. पंचवीस वर्षाच्या कार्यकाळात पहिल्यांदाच मंत्रीमंडळाच्या विस्तारात बीडमधील एकाही आमदाराला संधी मिळाली नाही. आता राज्यमंत्रीपदाचा शपथविधी येत्या काही दिवसांनी होईल, त्यात कुणाची वर्णी लागेल हे सांगता येत नाही.
मेटेंच्या कार्यकर्त्यांना आशा होती
घटक पक्षांना स्थान मिळून विनायक मेटे यांना मंत्रीमंडळात संधी मिळेल असं अनेकांना वाटत होतं. मेटे हे देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे म्हणुन ओळखले जातात. 2014 साली मेटेंना संधी मिळाली नाही, आता नक्कीच मिळेल असं वाटत असतांनाच त्यांना यावेळीही डावलण्यात आल्याने भविष्यात मेटे यांना भाजपा नेमकं काय देतयं हे पाहावे लागेल.