
300 जणांचे स्थलांतर, पुढील काही तास धोक्याचे
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा मुंबई पाहणी दौरा
नऊ जिल्ह्यांना रेडअलर्ट, बीड, संभाजीनगर, लातूरला ऑरेंज अलर्ट
मुख्यमंत्री मंत्रालयात बसून
बीड (रिपोर्टर): गेल्या चार दिवसांपासून राज्यभरात संततधार सुरू असल्याने मुंबई महानगरीसह कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात रेडअलर्ट घोषीत करण्यात आला आहे तर मराठवाड्यातील बीड, संभाजीनगर, लातूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट घोषीत करण्यात आला आहे. तिकडे मुंबई महानगरी धुवाधार पावसाने त्रस्त असून शहरात जिकडेतिकडे पाणीच पाणी दिसू लागल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मिठी नदी दुतर्फा वाहत असल्याने ती केव्हाही मुबंई महानगरीला मिठीत घेऊ शकते, अशी शक्यता असल्याने शासन-प्रशासन अत्यंत सतर्क झाले आहे. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरीची पाहणी केली आहे. तिकडे मुख्यमंत्री मंत्रालयात बसून आहेत. मुंबईत शासकीय-निमशासकीयसह खासगी सुट्टी प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत केले आहे. मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढली असून ती धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. परिणामी कुर्ला येथील क्रांती नगर आणि कुर्ला पूल परिसरात पाणी शिरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची (छऊठऋ) टीम घटनास्थळी तैनात करण्यात आली असून कोणतीही आपत्ती ओढवू नये यासाठी तयारी ठेवण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी स्थानिक नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने जवळच्या शाळांमध्ये आश्रय घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच नागरिकांसाठी शाळांमध्ये अन्न व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून आपत्कालीन पावले उचलण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत. मुसळधार पावसामुळे आणखी अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी प्रशासन सज्ज आहे.
नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना म्हणाले, ठाणे जिल्ह्यात हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. बुधवारपर्यंत रेड अलर्ट असल्याने पुढील दोन दिवस आवश्यक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. लोकांच्या जीवापेक्षा जास्त काही महत्त्वाचे नाही, असे सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री, सर्व महापालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. सर्व संबंधित टीम्स फील्डवर काम करत आहेत. लोकांचे जीवित सुरक्षित राहावे आणि कोणतीही हानी होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे नागरिकांनी गरजेशिवाय घराबाहेर पडू नये, असे पुन्हा आवाहन करण्यात आले आहे. महापालिका यंत्रणा पूर्णपणे कामात आहे.
ठाण्यातही पाणी भरलं होतं, शहरातील बर्याचशा सखल भागांमध्ये पाणी भरलं आहे. मी काल आयुक्तांशी बोललो. सहा तासांमध्ये 200 ाा पाऊस पडला आहे आणि 24 तासात तीनशे मिलिमीटर पाऊस झाला आहे. कमी वेळेमध्ये जास्तीचा पाऊस या ठिकाणी झाला आहे. त्यामुळे मिठी नदी दुथडी भरून वाहत आहे. प्रशासन अलर्ट मोडवर आहे. काही लोक कंट्रोल रूममध्ये आहेत, काही लोक फील्डवर काम करत आहेत. होल्डिंग पॉईंट देखील भरलेले आहेत, कमी वेळेत जास्त पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, धोका ओळखून जवळपास तीनशे पेक्षा जास्त लोकांना आपण सुरक्षित स्थळी हलवले आहे, जिथे धोका आहे त्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. ते काम महानगरपालिका करत आहे. मुंबई जीवीत हानी होऊ नये आणि मालमत्तेचा नुकसान होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेचे, प्रशासनाचे सर्वाधिकारी फिल्डवर काम करत आहेत, अशी माहितीही शिंदेंनी दिली आहे.








