बीड, दि. २ सप्टेंबर – मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेले कित्येक महिने सुरु असलेल्या संघर्षाला आज मोठे यश मिळाले. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याची अधिकृत घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाचे वातावरण पसरले. राज्यभरात मराठा बांधवांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत, एकमेकांना मिठ्या मारून आणि जल्लोष करत ऐतिहासिक क्षणाचा उत्सव साजरा केला.
बीडच्या शिवाजी महाराज चौकात विशेष उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले. चौकात शेकडो कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकत्र जमून “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या घोषणांनी परिसर दणाणून टाकला. “पाटील… पाटील…”, या घोषणांनी आसमंत गुंजून गेला. मराठा समाजाच्या चेहऱ्यावर सुटकेचा आनंद स्पष्ट दिसत होता.
यावेळी काही ठिकाणी समाजबांधवांनी सरकारला इशाराही दिला. “फसवणूक झाली तर पुन्हा एकही नेता गावात फिरू देणार नाही,” असा निर्धार व्यक्त करण्यात आला. त्यामुळे हा आनंदसोहळा जरी उत्साहात साजरा झाला असला, तरी जनतेच्या मनात सावधगिरीचा सूरही उमटताना दिसला.
मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या लढ्यामुळे मराठा समाजाच्या प्रश्नाला नवे वळण मिळाले असून, मागण्या मान्य झाल्यामुळे हा संघर्ष ऐतिहासिक ठरला आहे. राज्यभरातून आलेल्या प्रतिक्रिया पाहता, मराठा समाजात समाधान आणि सरकारबद्दलची अपेक्षा दोन्हीही वातावरणात जाणवत आहेत.
आजच्या या निर्णयामुळे मराठा समाजाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला असून, बीडसह संपूर्ण महाराष्ट्र आनंदोत्सवात सामील झाला आहे.









