
चोर्या, घरफोड्या, दरोडे, खुनाचा प्रयत्न, मारहाणीसह दहशतीचे होते आरोपींवर गुन्हे
बीड (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी मोठी कारवाई करत पाच कुख्यात गुंडांना दोन वर्षांसाठी जिल्ह्याबाहेर हद्दपार केले आहे. या गुंडांच्या विरोधात मारहाण, रस्ता अडवणे यासह इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
बीड जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतरच एसपी काँवत यांनी जिल्ह्यातील चोर्या, घरफोड्या, दरोडे, खुनाचे प्रयत्न, मारहाणीचे प्रकार आणि गुंडगिरी करणार्या टोळ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांना अशा गुन्हेगारांवर कठोर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. धारूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि देविदास वाघमोडे यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार, धारूर व केज तालुक्यात तसेच शेजारील जिल्ह्यांत दहशत माजवणार्या आर्यन उर्फ शंकर मधुकर शेप (वय 25, लाडेवडगाव), कल्याण वचिष्ट शेप (वय 27, लाडेवडगाव), उज्वल उर्फ दादा महादेव मुंडे (वय 23, भायजळो), गणेश उर्फ संकेत सुरेश गंगात्रे (वय 24, आडस) आणि रंगनाथ पाटील लांब (वय 34, बनकरंजा) या पाच गुंडांवर कारवाई करण्यात आली आहे.
सदर गुंडांच्या टोळीवर खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, दरोडा, दुखापत, रस्ता अडवून मारहाण, गुंडगिरी आणि लोकांमध्ये दहशत निर्माण अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. त्यामुळे या टोळीची पांगापांग करून जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये हद्दपारीची कारवाई करण्यात आली.सदर प्रस्तावावर उपविभागीय पोलीस अधिकारी (केज) यांनी सखोल चौकशी करून, संबंधितांना स्पष्टीकरणाची संधी दिल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी दि. 17 ऑक्टोबर 2025 रोजी अंतिम आदेश जारी केले. या आदेशानुसार संबंधित टोळीला बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीबाहेर दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, उपविभागीय पोलीस अधिकारी त्रयीकेश शिंदे, सपोनि देविदास वाघमोडे (धारूर), तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक अभिमन्यु औताडे, पोशि आलिम शेख आणि पोशि बिबिशन चव्हाण यांच्या संयुक्त पथकाने केली. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी सांगितले की, भविष्यातही जिल्ह्यातील गुंड, टोळीबाज आणि दहशत माजवणार्यांविरुद्ध एमपीडीए, मकोका आणि हद्दपार अशा कठोर कारवाया सुरूच राहतील. बीड पोलीसांची ही कारवाई जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.









