
माजलगावच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.प्रकाश सोळंके यांनी नुकत्याच झालेल्या कार्यकर्ता बैठकीत केलेले विधान केवळ वादग्रस्त नाही, तर ते महाराष्ट्राच्या निवडणूक प्रक्रियेच्या नितीमत्तेच्या चेहर्यावरचा चपराकीचा ठसा आहे. निवडणूक ही लोकशाहीची पवित्र प्रक्रिया आहे असं आपण सगळे म्हणतो, पण या विधानाने त्या पवित्रतेवरच सत्तेच्या अहंकाराचा बूट आपटला आहे.
चपटी, बोटी आणि लक्ष्मीदर्शनच्या दारुगोळ्याने सज्ज व्हा’ – ही एक ओळ ऐकताना कोणाच्याही अंगावर काटा यायला हवा. कारण हे बोलणारे कोणी रस्त्यावरचा कार्यकर्ता नाहीत; हे आहेत विधानसभेचे ज्येष्ठ सदस्य, जे स्वतःला लोकप्रतिनिधी’ म्हणवून घेतात. ही निर्लज्ज कबुली म्हणजे हो, आम्ही पैसे, प्रलोभने आणि सत्ता वापरूनच निवडणुका जिंकतो!’ असा अभिमानाने दिलेला आत्मघातकी खुलासा आहे.
आ. सोळंके यांनी हे विधान सत्य बोललो म्हणून’ केलं असं काहींना वाटेल. पण इथे प्रश्न सत्याचा नाही – इथे प्रश्न संविधानिक जबाबदारीचा आणि नैतिकतेचा आहे. सत्ता म्हणजे सर्वकाही आणि निवडणूक म्हणजे एक नफा-तोट्याचा व्यवहार – असा दृष्टिकोनच जेव्हा आमदार पातळीवरून समोर येतो, तेव्हा टी.एन. शेषन यांच्या काळातील निवडणूक आयोगाची आठवण दगड झालेल्या विवेकावर आपटते.
एकेकाळी निवडणूक आयोग म्हणजे कणखरपणाचे प्रतीक होतं. टी.एन. शेषन यांनी पंतप्रधानांनाही वचक बसवला होता. पण आता आयोग म्हणजे निर्जीव संस्थेचा मुखवटा, ज्याच्या हाती सत्ता आली तरी आत्मा हरवला आहे. हा व्हिडिओ आता देशभर फिरत असताना आयोग कुठे आहे? कुणी चौकशी केली का? कुणी नोटीस काढली का? नाही! कारण आता सत्ताधार्यांच्या सावलीत जगणार्या व्यवस्थेकडून कोणतीच अपेक्षा ठेवणं म्हणजे भाबडेपणा.
आ. सोळंके यांचा हा व्हिडिओ म्हणजे निवडणूक आयोगालाच नव्हे, तर अजित पवारांनाही एक तडाखा आहे. कारण ज्या पक्षाने स्वतःला फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसदार म्हणून मिरवलं, त्याच पक्षाचा आमदार निवडणुकीत लक्ष्मीदर्शन शिकवतोय! हे फक्त ढोंग नाही, तर त्या विचारांच्या थडग्यावर उभं राहून टाळ्या वाजवण्यासारखं आहे.
लोकशाहीत निवडणुका या जनतेच्या विश्वासावर उभ्या असतात, पण आता त्या सत्तेच्या अहंकारावर, पैशाच्या ओघावर आणि अपराधी मानसिकतेवर उभ्या आहेत. आणि या व्हिडिओने त्यावर शिक्कामोर्तबच केलं आहे. आपण काहीही केलं तरी आपल्याचं काही बिघडत नाही – हा सत्तेचा गर्व आता बेशरमपणात परिवर्तित झाला आहे.
आजची परिस्थिती अशी आहे की, कुणी हे प्रश्न विचारले तरी त्यांना नकारात्मकता पसरवणारे ठरवले जाते. पण सत्य एवढं कडवट आहे की, ते गिळायला आयोग, प्रशासन आणि समाज तिघेही तयार नाहीत.
आ. प्रकाश सोळंके यांनी जे बोलले ते केवळ एक विधान नाही, तर लोकशाहीच्या चेहर्यावर मारलेली चपराक आहे. ही चपराक आयोगालाही, व्यवस्थेलाही, आणि अजित पवारांसारख्या विचारांच्या ढोलक्यांनाही आहे.
कारण जेव्हा सत्ताधार्यांचा माज लोकशाहीवर मात करतो, तेव्हा निवडणुका म्हणजे जनतेचा उत्सव नव्हे, तर पैशाचा तमाशा ठरतात. आणि हा तमाशा थांबविण्यासाठी आज जर कुणी पुढे आले नाही, तर उद्या निवडणूक आयोग हा शब्दही इतिहासात फक्त संदर्भ म्हणूनच उरणार आहे.
कटाक्ष -गणेश सावंत








