बीड जिल्ह्यातील 7 लाख शेतकर्यांना 708 कोटी मिळणार
बीड, (रिपोर्टर)ः- राज्य सरकारने शेतकर्यांना रब्बी पेरणीसाठी हेक्टरी 10 हजार रूपये देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सरकारने मराठवाड्यातील 45 लाख शेतकर्यांसाठी 4485 कोटी रूपयांची तरतुद केली असून त्याला मंजुरी सुध्दा देण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील 7 लाख 37 हजार शेतकर्यांसाठी 708 कोटी रूपये मंजूर झालेले आहेत. याद्या अपलोड करण्याचे काम सुरू असून याद्या अपलोड झाल्यानंतर शेतकर्यांना त्यांच्या खात्यावर पैसे पडणार आहेत.
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. राज्यातील जवळपास 70 लाख हेक्टर पिकांपेक्षा जास्त पिकांची नासाडी झाली. राज्य सरकारने शेतकर्यांना 31 हजार कोटींची मदत जाहिर केली होती. सदरील ही मदत दोन प्रकारची होती. त्यामध्ये रब्बी पेरणीसाठी हेक्टरी दहा हजार रूपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. राज्य सरकारने रब्बी पेरणीसाठी राज्यातील 45 लाख शेतकर्यांसाठी 4485 कोटी रूपयाचीं मंजुरी दिली. बीड जिल्ह्यातील 7 लाख 37 हजार शेतकर्यांसाठी 708 कोटी रूपये मंजूर करण्यात आले होते. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील 6 लाख 88 हजार शेतकर्यांसाठी 608 कोटी रूपये मंजूर करण्यात आले. जालना जिल्ह्यातील 6 लाख 31 हजार शेतकर्यांसाठी 461 कोटी, धाराशिव 5 लाख 66 हजार शेतकर्यांसाठी 577 कोटी, लातुर 5 लाख 19 हजार शेतकर्यांसाठी 565 कोटी, परभणी जिल्ह्यातील 4 लाख 39 हजार शेतकर्यांसाठी 495 कोटी, हिंगोली 2 लाख 97 हजार शेतकर्यांसाठी 341 कोटी आणि नांदेड जिल्ह्यातील 7 लाख 80 हजार शेतकर्यांसाठी 727 कोटी रूपये मंजूर करण्यात आलेले आहेत. सध्या याद्या अपलोड करण्याचे काम सुरू असून याद्या अपलोडझाल्यानंतर शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.









