त्रास देणार्या सावकाराची खैर नाही; रात्रीतून माजलगाव तहसिलदारांसह वडवणी पोलिस पुजाच्या घरी,
आज दुपारनंतर जिल्हाधिकारी शर्मा मुलीची घेणार भेट, दोन दिवसापूर्वी रिपोर्टरने केले होते वृत्त प्रकाशित
बीड/माजलगाव (रिपोर्टर) सावकाराने केलेल्या अन्यायाविरोधात थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार्या माजलगाव तालुक्यातील पुनंदगावच्या पुजा शेखर सावंत या मुलीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट भ्रमणध्वनीवरून संवाद साधत घटनेची माहिती समजावून घेतली. सदरच्या प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना देण्यात आले असून आज दुपारी जिल्हाधिकारी हे स्वत:हून पुजा शेखर सावंत या मुलीची भेट घेणार आहेत. या भेटीनंतर पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येते. सदरचे प्रकरण हे सर्व प्रथम सायं.दै.बीड रिपोर्टरने प्रकाशझोतात आणल्यानंतर या प्रकरणाचे गांभिर्य बीड जिल्हा प्रशासनासह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आले आहे.
याबाबत अधिक असे की, वडवणी तालुक्यतील कुप्पा या गावची मुळ राहणारी आणि सध्या माजलगावच्या पुनंदगावात वास्तव्यात असलेली पुजा शेखर सावंत या नवविवाहीत मुलीने आपल्यावर झालेल्या अन्यायाची कहानी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर गेल्या काही दिवसापूर्वी मांडली होती. हि माहिती बीड रिपोर्टरला झाल्यानंतर रिपोर्टरने 29 सप्टेंबर वार-गुरूवार 2022 रोजी सदरचे वृत्त पहिल्या पानावर ठळकपणे प्रसिध्द केले होते. सदरील पिडीत पुजा हिच्या लग्नासाठी तेथील एका सावकाराने स्थळ आणले. पुजाच्या वडिलाकडे लग्नासाठी पैशाची व्यवस्था नव्हती. तेव्हा सावकाराने दोन एक्कर जमीन लिहून घेत दहा लाख रूपये कर्ज दिले. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी तात्काळ पैशाची मागणी केली. पैसे दिल्यानंतरही जमीन घेण्याचा अट्टाहास मांडला तेव्हा सावकारानेच सासरच्या मंडळीला मुलगी नांदवू नका असे सांगितले. त्यामुळे पुजाला घराबाहेर काढण्यात आले आणि ती आता आपल्या माहेरी आहे. या सर्व प्रकरणामुळे पुजाचे वडिल शेखर हे स्वत:ला अपमानीत समजून आत्महत्येचा मार्ग पत्कारू लागले. याप्रकरणाची माहिती पत्राद्वारे पुजा सावंत यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले. सदरचे वृत्त रिपोर्टरने प्रकाशित केल्यानंतर बीड जिल्हा प्रशासनासह महाराष्ट्र शासन खडबडून जागे झाले. काल पुजा सावंत हिला थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. घटनेची माहिती ऐकून घेतली आणि संबंधीत प्रकरणात तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. मुख्यमंत्र्यांनीच मुलीशी संवाद साधल्यानंतर माजलगावचे महसूल अधिकारी, तहसिलदार, वडवणी पोलिस यांनी घटनास्थळी म्हणजे मुलीच्या घरी धाव घेतली. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले तर आज दुपारनंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे पुजा सावंतची भेट घेणार आहेत.
रिपोर्टर इफेक्ट
पुजा सावंत या मुलीवर झालेल्या अन्यायाचे वृत्त गेल्या दोन दिवसापूर्वी रिपोर्टरने प्रथम पानावर ठळकपणे प्रकाशित केल्यानंतर जिल्हा प्रशासन सदरच्या घटनेने हादरले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेचे गांभिर्य ओळखून थेट पिडीत पुजा सावंत हिच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. रिपोर्टरने वृत्त प्रकाशित करून न्याय देण्याचा प्रयत्न केल्यामुळे पिडीत कुटूंबाकडून रिपोर्टरचे धन्यवाद.