गेवराई (रिपोर्टर)- कोळगाव येथील सुर्यमंदिर संस्थानचे मठाधिपती यांनी आत्महत्या करण्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली. रात्रीपासून संबंदित महाराजांचा शोध सुरू असून अद्यापपर्यंत महाराज मिळून आले नसल्याने गेवराई तालुक्यातील नागरिकांसह पोलिस प्रशासन त्यांचा ठिकठिकाणी शोध घेत आहेत.
गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे सुर्य मंदिर संस्थान आहे. या संस्थानात मठाधिपती म्हणून हनुमान महाराज गेल्या अनेक दिवसांपासून आहेत. काल रात्री हनुमान महाराज यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला. त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आत्महत्या करत असल्याचे सांगितले. गावातील काहींनी आपल्या विरोधात कट करत बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले. कट करून विनयभंग केल्याचा आरोप करत मारहाण करून व्हिडिओ केला आणि तो व्हायरल केला, पैसा न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी दिली. मी पाच लाख रुपये न दिल्याने माझ्यावर विनयभंगासह ऍट्रॉसिटी ऍक्टचा खोटा गुन्हा दाखल केला. मला सात्याने त्रास दिला जात आहे. माझे चारित्र्य चांगले आहे, आता मला जगण्याची इच्छा नाही, म्हणत आत्महत्या करत असल्याचे सांगत सुसाईड नोटमध्ये ज्यांची नावे लिहिली आहेत ते यास जबाबदार आहेत, असा व्हिडिओ करत महाराजांनी काल व्हिडिओ व्हायरल केला त्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिस प्रशासनाने या व्हिडिओची गंभीर दखल घेत चकलांबा, नेकनूर पोलिसांनी पथके तयार करून त्यांची शोधाशोध सुरू केली मात्र आज दुपारी बारा वाजेपर्यंत हनुमान महाराज मिळून आले नव्हते.