मोठी बातमी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावलं
‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. आज निवडणूक आयोगाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवले आहे. यासंदर्भातला अंतरिम आदेश निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री जारी केला. अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक तसेच याप्रकरणी अंतिम आदेश येईपर्यंत हा आदेश कायम राहील.
त्यामुळे उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्यापैकी कोणत्याही गटाला शिवसेनेचे नाव किंवा निवडणूक चिन्ह वापरता येणार नाही. या दोन्ही गटांना त्यांच्या पक्षाचं नवं नाव आणि निवडणूक चिन्हांचे प्राधान्यक्रम सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत द्यायचे आहेत. या नावात त्यांना शिवसेनेचं नाव वापरण्याची मुभा निवडणूक आयोगानं दिली आहे. अंधेरी निवडणुकीत ठाकरे गट आधि शिंदे गट अशा नावाने निवडणूक लढवावी लागेल, अशी माहिती समोर येत आहे.
निवडणूक आयोगाचे मत काय?
आयोगाने म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या वतीने अनिल देसाई यांनी 25 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काही आमदारांनी केलेल्या पक्षविरोधी कारवायांची माहिती आयोगाला दिली. ‘शिवसेना किंवा बाळासाहेब’ या नावांचा वापर करून कोणताही राजकीय पक्ष स्थापन करण्यावर त्यांनी अगोदरच आक्षेप घेतला होता.
उद्धव ठाकरे पक्षप्रमुख असल्याची
देसाईंची आयोगाला माहिती
उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख असल्याचेही सांगण्यात आले. त्यानंतर अनिल देसाई यांच्या दिनांक 01.07.2022 च्या ईमेलमध्ये 30.06.2022 रोजी जारी करण्यात आलेली 3 पत्रे जोडली होती, ज्यामध्ये पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्या चार सदस्यांनी स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडल्याचे नमूद केले होते. त्यामुळे शिवसेनेतील नेत्याची पक्षाच्या उपनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. यात एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, तानाजी सावंत, उदय सामंत यांचा समावेश होता.