Friday, May 20, 2022
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- सत्तेतला जीवात्मा हे राम!

अग्रलेख- सत्तेतला जीवात्मा हे राम!

चले जाओ…! करेंगे या मरेंगे..! हे राम..! अशा साध्या सुध्या शब्दांना वेदमंत्राहुन अधिक महत्व याच भारत वर्षात मिळालं. ते एवढ्यासाठीच हे शब्द सत्त्याचे होते, सत्त्यासाठी होते, लोकांचे होते, लोकांसाठी होते. पारतंत्र्याच्या साखळ दंडात जखडलेल्या भारत वर्षाला मोकळे करण्या इरादे अंत:करणातून निघालेले हे शब्द नव्हे तर शस्त्र ठरले. अन् आज तुम्हा आम्हाला स्वातंत्र्याचा श्‍वास मिळाला. या शब्दांना अथवा ज्या काळात हे शब्द जे लोक उच्चारत होते ते कुठले जिवी होते? हा सवाल आता नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारावाच लागेल. आज ज्या भारत वर्षाचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत आणि ज्या आंदोलनातून हा भारत वर्ष स्वातंत्र्य झाला त्यामुळेच मोदींना नेतृत्व करता येवू लागले. त्या मोदींना आज शेतकर्‍यांचे आंदोलने आंदोलन जिवी वाटू लागतात, परावजिवी वाटु लागतात तेंव्हा अखंड हिंदुस्तानचं नेतृत्व करणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकांनी लोकांसाठी लोकंांकरिता चालवलेली लोकशाही मान्य नाही काय? लोकशाहीमध्ये न्याय हक्कासाठी आंदोलन करणे हा कायद्याने अधिकार असतांना त्या अधिकारावरच देशाचं नेतृत्व करणार्‍याकडून गदा येत असेल, आंदोलनकर्त्यांना आंदोलनजिवी म्हणून हिनवलं जात असेल, परावजिवी म्हणून हिनवलं जात असेल तर ही स्वतंत्र भारताच्या स्वतंत्र नागरिकाची गळचेपी नाही काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी आंदोलनाकडे सातत्याने दुर्लक्ष कर तआले आहेत. मग ते शेतकर्‍यांचं आंदोलन असो, नागरिकता कायदा आंदोलन असो, मराठा आंदोलन असो अथवा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रश्‍नावर निघालेलं कुठलंही आंदोलन असो या आंदोलनाबाबत ब्र शब्दही न काढणं हे धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपर्यंत राबवलं. त्यांच्या दृष्टीने आंदोलन करणे हा जणु गुन्हाच आहे. स्वतंत्र भारतात कायद्याने आंदोलनाला अधिकार दिला मात्र तोच अधिकार पंतप्रधानांना नकोय याचाच अर्थ पंतप्रधांनाना कायदा नकोय का? भारताचे सविधान नकोय का? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. देशाच्या सर्वोच्च संसदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी जेंव्हा शेतकरी आंदोलकांना आंदोलनजिवी, परावजिवी म्हणतात तेंव्हा ते अशा एकाच आंदोलनाविषयी प्रतिक्रिया देत नाही तर त्यांनी या अगोदर ही अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. आपल्या


सोयीनुसार आंदोलनाकडे
पाहणारे पंतप्रधान

हे फक्त नरेंद्र मोदीच असू शकतात. जेंव्हा नागरिकत्व कायद्याबाबत देशभरात आंदोलन उभे राहले ते आंदोलनही असे दिवसेंदिवस वाढत राहिले. तेंव्हा पंतप्रधानांनी जाहिर व्यासपीठावरून या आंदोलनावर भाष्य करतांना जे म्हटले ते देशाचं नेतृत्व करणार्‍या व्यक्तीला शोभणारं तर नाहीच नाही मात्र देशात जात, पात, धर्म, पंताला प्रोत्साहन देणारं होतं. नागरिकत्व कायद्याबाबत आंदोलक जेंव्हा आंदोलन करत होते तेंव्हा नरेंद्र मोदी म्हणाले होते, आपण जेंव्हा हे आंदोलन टिव्हीवर पाहतो तेंव्हा कपड्यावरून हे लोक दिसून येतात. याचा अर्थ काय? तुम्ही अखंड हिंदुस्तानचे नेृत्व करत आहात. या सार्वभौम लोकशाहीचा देश आहे आणि या देशात जी लोकशाही आहे ती जात,पात, धर्म, पंत यापेक्षा भारतीय संविधानाला सर्वश्रेष्ठ मानणारी आणि त्याच देशात पंतप्रधान असणार्‍या व्यक्तीने विशिष्ट समुदायाबाबत असे नकारात्मक भाष्य करणं नक्कीच शोभणारं नाही. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांच्या निर्णय प्रणाली विरोधात आवाज उठवलेलं चालत नाही. जो कोणी आवाज उठवतोक त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न या देशात केला जातो. सीबीआय, ईडी यासारख्या संस्था आवाज उठवणार्‍या विरोधात शस्त्र म्हणून वापरल्या जातात. हे सर्वश्रुत असतांना जेंव्हा

अन्नदाताच
परावजिवी

म्हणून हिनावला जातो तेंव्हा मात्र तळपायाची आग मस्तकाला गेल्या शिवाय राहत नाही. अरे जो शेतकरी घामाचं रक्त ओकत काळ्या आईची सेवा करतो, असेल त्याच्यात समाधान मानतो, चटणी भाकरी घावून आपल्या शेतात अन्न धान्य पिकवतो आणि त्या धान्याच्या राशीवर कंटाळून, वैतागुन आत्महत्या करतो. स्वत: मरण पत्कारतोपरंतू अखड देशाचेच नव्हे तर जगाचे पोट भरतो. म्हणूनच त्याला अन्नदाता म्हणून तुम्ही आम्ही संबोधतो. तोच शेतकरी आज रस्त्यावर आहे, शेतकरी विरोधी कायद्याविरोधात दिल्लीच्या सिमेवर गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन करत आहे, त्या आंदोलनाला आणि आंदोलनात सामील झालेल्या लोकांना शेतकर्‍यांना, कष्टकर्‍यांना परावजिवी म्हणून हिनवण्यात आलं. परावजिवी तर तुम्ही लोकांच्या मतावर निवडुण आल्यानंतर लोकांच्या विश्‍वासाची जी गळचेपी केली तो परावजिवी म्हणाव लागेल. स्वत:च्या ताकदीवर कोणावरही अवलंबून न राहता मग तो ईश्‍वर असो की निसर्ग असो, शासन असो कि प्रशासन असो यांच्या मदतीची कुठलीही वाट न बघता मडे झाकुनिया करती पेरणी, कुणबी याचे वाही लवलाई घरात एखादा माणुस मेला आणि तो त्या शेतकर्‍याचा पेरणीचा असला तर शेतकरी आधी पेरणीला महत्त्व देतो, घरातलं मढ झाकून ठेवतो, पेरणी करून येतो आणि नंतर आपल्या दु:ख जगासमोर मांडतो. हा अन्नदाता परावजिवी असू शकतो का? शेतकर्‍यांना अथवा कुठल्याही आंदोलकांना आंदोलनजिवी, परावजिवी संबोधने हे त्या विशिष्ट आंदोलकाचा अथवा आंदोलनाचा अपमान नव्हे तर सत्त्यासाठी आवाज उंवणार्‍या त्या प्रत्येक व्यक्तीचा अपमान आहे. एवढेच नव्हे तर अखंड ं भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी खर्ची पडलेल्या क्रांतीवीरांचा तो अपमानच.

जगाच्या पाठीवर
गांधीजींचा सत्त्याग्रह
नाव कमवून गेला. चले जाओ, करेंगे या मरेंगे, हे राम अशा साध्या सुध्या शब्दांना आंदोलनामुळेच वेदमंत्राहूनही मोठे प्रामाण्य मिळाले. तुम मुझे खून दो मै तुम्हे आझादी दुँगा या सुभाषचंद्र बोसांच्या क्रातंीकारी घोषणेचा क्रांतीजिवी अथवा परावजिवी म्हणून अवहेलनाच म्हणावी लागेल. स्वातंत्र्य माझा जन्म सिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं ठणकावून सांगणार्‍या लोकमान्य टिळकांचा आणि त्यांच्या आंदोलनाचा अपमान नव्हे काय? सावरकरांच्या त्या आंदोलनाचा तो अपमान नव्हे काय? देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी हसत-हसत फासावर चढणार्‍या मेरा रंग दे बसंती चोला म्हणत केवळ देशासाठी आंदोलक म्हणून बलिदान देणार्‍या भगतसिंहाचा हा अपमान नव्हे काय? किती उदाहरणे द्यायची? या देशात आजपर्यंत किती आंदोलने झाली? पारतंत्र्यात असतांना आंदोलन करणारी जमात कोणती हा जेंव्हा प्रश्‍न विचारला जाईल तेंव्हा प्रत्येक भारतीयांच्या तोंडून होय ती आमचीच जमात म्हणजे भारतीय असे उत्तर येईल. स्वातंत्र्यानंतरही या देशामध्ये अनेक आंदोलने झाली. जेंव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली तेंव्हा जे आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनाला इंदिरा गांधींनी शुद्र विचारांसारखं अवहेलनीत केलं नाही. परंतू आज सत्त्यासाठी, न्याय हक्कासाठी जर कोणी आंदोलन करत असेल तर त्या आंदोलकांना नमो रूग्ण होत नाव ठेवले जात असेल. तर ते दुर्दैव म्हणाव लागत होतं परंतू आता देशाचं नेतृत्व करणारा अखंड हिंदुस्तानचा प्रथम नागरिक आंदोलनाबाबत आंदोलनजिवी, परावजिवी शब्द प्रयोग करत असेल तर या पेक्षा या देशाचं कुठलंही मोठं दुर्दैव नसेल. आंदोलन हा अधिकार घटनेने या देशाला दिला आहे आणि ज्या वेळेस प्रशासन व्यवस्था कोंडी करत असते त्यावेळेस शासन व्यवस्थेत बसलेल्या लोकांनी ती कोंडीत तोडायची असते. मात्र इथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात असलेलं सरकार कोंडी सोडायची सोडून त्या लोकांनाच आणखी कोंडीत कस पकडता येईल आणि कोंडीत पकडताच आलं नाही तर त्यांना बदनाम कस करता येईल याकडे लक्ष देत आहे. नक्कीच स्वतंत्र भारतात आंदोलन करत असतांना हे आंदोलन शांततेच्या मार्गाने असावं याबाबत भाष्ट करणं समजू शकु परंतू आंदोनलाच्या अधिकाराचाच गळा घोटणं हे हुकुमशाहीचं लक्षण नक्कीच आहे.


आजची सत्ता
आंदोलनजीवींची

असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आजपर्यंत आंदोलनामुळेच चांगलं घडत आलं, गांधीजींच्या सत्याग्रहाने स्वातंत्र्य मिळवून दिलं, इंग्रजांना देशाबाहेर हाकललं, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना नवनिर्माण आंदोलनामुळे पायउतार व्हावं, लागलं, रामजन्मभूमी आंदोलन उभं राहिलं ते रस्त्यावर आलं, घराघरात गेलं तेव्हा कुठं आंदोलकांना आंदोलनजीवी म्हणून हिणवणार्‍यांची सत्ता केंद्रात आली. इथंही आंदोलनानेच यश मिळवलं. भाजपाला सत्तेची भाकरी खाऊ घालण्यात आंदोलनाचाच सिंहाचा वाटा आहे. जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं जनलोकपाल आंदोलन ‘मै भी अण्णा आणि तू भी अण्णा’ म्हणत देशभरात आग लावून गेलं. तेव्हा कुठं तत्कालीन कॉंग्रेस आघाडी सरकारला पायउतार व्हावं लागलं आणि आज भाजपाला दिल्लीचं तख्त सांभाळण्याचं भाग्य मिळालं तेही आंदोलनामुळेच. परंतु तरीही आंदोलनाला आणि आंदोलकांना पराभवलंबी आणि आंदोलनजीवी म्हणत असतील तर हे राम! म्हणण्याची वेळ राज्यकर्त्यांवर आल्याशिवाय राहणार नाही. सत्तेतला जीवात्मा कायमस्वरुपी सत्तेत राहत नाही हा या देशाचा इतिहास आहे.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!