बीड (रिपोर्टर) जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात विधीमंडळाची पंचायत राज समिती बीड जिल्हा दौर्यावर येत असून त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पंचायत राज कमिटीसाठी आपआपल्या विभागाचे कामकाज अद्यावत करणे, पंचायत राज कमिटीच्या तपासाच्या अनुषंगाने विविध अधिकारी कर्मचार्यांच्या समित्या स्थापन करण्याची लगबग बीड जिल्हा परिषदेमध्ये आहे.
महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा दौर्यावर विधीमंडळाची पंचायत राज समिती येत आहे. परभणी जिल्हा परिषदेची तपासणी झाली की बीड जिल्ह्याच्या दौर्यावर या समितीचे येणे निश्चित झाले आहे. लवकरच हि समिती दौर्याची तारीख जिल्हा परिषद प्रशासनाला कळवेल. जवळपास पंधरा ते वीस विधीमंडळाचे आमदार या पंचायत राज समितीमध्ये असतात. हे आमदार जिल्हा परिषदेचे लेखापरिक्षणाचे अहवाल झालेला खर्च, चाललेले वेगवेगळे कामे, झालेले कामे या सर्वांची तपासणी करत असतात. त्यामुळे पंचायत राज समितीचा दौरा हा अत्यंत महत्वाचा दौरा असतो. त्यामुळे प्रत्येक विभागाचे अधिकारी हे आपल्या विभागाचे काम डोळ्यात तेल घालून करतात. काल हि समिती जिल्हा दौर्यावर येण्याच्या अनुषंगाने सर्व खातेप्रमुख, विविध अधिकारी यांची सलग सहा तास मेरॉथान बैठक जिल्हापरिषेदेच मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी घेतली आहे. या समितीला सामोरे जाण्यासाठी आपल्या विभागाचे कामकाज कसे असावे? कोणते लेखे कसे अद्यावत तयार करावे? त्यादृष्टीने स्थापन करावयाच्या समित्या याबाबत कालच्या बैठकीमध्ये सर्व खातेप्रमुख आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी यांची बैठक झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे प्रशासन झाडून पुसून कामाला लागले आहे.