बीड (रिपोर्टर) बनावट दस्तावेज तयार करून मद्यविक्रीचा परवाना परस्पर दुसर्याच्या नावे केल्याने बीडमधील स्वातंत्र्य सैनिकाच्या विधवा आणि वयस्कर पत्नीने थेट राष्ट्रपतींकडे देह त्यागाची परवानगी मागितली आहे.
सत्यभामा शिंदे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून आपली कैफियत मांडली. वयाची 89 वी सर केलेली ही महिला आहे. सत्यभामा यांचे पती स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांना विविध प्रमाणपत्रांनी गौरविण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर रंगनाथ शिंदे यांना उदरनिर्वाहसाठी मद्यविक्रीचा परवाना देण्यात आला होता. आष्टी येथे त्यांचा व्यवसाय आहे. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह सुरू होता. मात्र सत्यभामा यांच्या पतीच्या निधनानंतर काही जणांनी प्रशासनातील अधिकार्यांना हाताशी धरत बनावट कागदपत्र तयार केले आणि परस्पर दुकान परवाना नावावर केला. सत्यभामा यांनी अनेक शासकीय कार्यालयांची उंबरे झिजवली. न्याय तर सोडा पदरी निराशा मिळाली. आता प्रचंड थकले आहे, त्यामुळे फसवणूक करणार्यावर योग्य ती कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी सत्यभामा यांनी केली. वेळोवेळी प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवून देखील न्याय मिळत नसल्याने अखेर नव्वद वर्षीय सत्यभामा यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून देह त्यागाची परवानगी मागितली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी देह त्यागाची परवानगी मागितली. यावर अद्याप कुठलेही उत्तर मिळाले नाही. स्वातंत्र्य लढ्यात संपुर्ण आयुष्य झिजवणार्या स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीला स्वतंत्र भारतात आणि पुरोगामी महाराष्ट्रात देह त्यागाची मागणी करावी लागते ही प्रशासनातील भ्रष्ट अधिकार्यांना सनसनीत चपराक आहे.