स्व. मुंडेंच्या नसण्याने भाजप आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी
परळी (रिपोर्टर) स्व. गोपीनाथराव मुंडे हे आपल्यात नाहीत याची जाणीव आम्हा सर्वांना सातत्याने होते. भाजपमधील महाराष्ट्रातील आणि केंद्रातील ते खूप मोठे लोकनेते म्हणून होऊन गेले, त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून न निघणारी आहे. असे खा. सुप्रिया सुळे यांनी म्हटले. त्या काल परळी शहरात आले असता त्यांनी गोपीनाथ गडावर जावून स्व. मुंडेंच्या समाधीचे दर्शन घेतले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सुप्रिया सुळे यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. ढोल-ताशांचा प्रचंड गजर, फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण आणि राष्ट्रवादी पक्षाच्या जय जयकाराने अवघे शहर रात्री दुमदुमून गेले होते.
काल रात्री उशीरा खा. सुप्रिया सुळे या परळीत डेरेदाखल झाल्या. राष्ट्रवादीच्या पदाधिकारी,
कार्यकर्त्यांनी सुप्रिया ताईंचे जल्लोषात स्वागत केले. चौका चौकामध्ये ढोल-ताश्यांचा गजर, फटाक्यांची आतिषबाजी, हार तोरण ओवाळणी जिथे तिथे होताना दिसून आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जयजयकाराने अक्षरश: परळी शहर दुमदुमून गेले होते. सुप्रिया सुळेंच्या स्वागतासाठी अवघी परळी रस्त्यावर उतरल्याचे चित्र पहावयास मिळत होते. कार्यकर्त्यांचे, पदाधिकार्यांचे स्वागत-सत्कार स्वीकारल्यानंतर खा. सुप्रिया सुळे यांनी गोपीनाथ गडावर जावून स्व. मुंडेंच्या समाधीचे दर्शन घेतले. या वेळी माध्यमांशी बोलताना सुप्रियाताई म्हणाल्या की, स्व. गोपीनाथराव मुंडे आपल्यात नाहीत, याची जाणीव आम्हा सर्वांना सातत्याने होते. भाजपामधील, महाराष्ट्रातील आणि केंद्रातील खूप मोठे लोकनेते म्हणून ते होऊन गेले. केेंद्रामध्ये जेव्हा त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यानंतर अल्पावधीत ते आपल्यातून निघून गेले. त्यामुळे भाजपामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून न निघणारी आहे. मला एका गोष्टीचा सार्थ अभिमान आहे, त्यांच्या सुपुत्री लोकसभेमध्ये संसदपटू म्हणून अतिशय उत्तम काम करतायत असेही सुप्रिया सुळेंनी म्हटले. या वेळी आ. संजय दौंड, गटनेते वाल्मिक कराड, गोविंद फड, सुर्यभान मुंडे, बालाजी मुंडे, तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, शहराध्यक्ष बालाजी धर्माधिकारी, चंदुलाल बियाणी, दीपक देशमुख, शकील कुरेशी, भास्कर चाटे, वैजिनाथ सोळंके, सुरेश टाक, शरद मुंडे यांच्यासह आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.