मुंबई (रिपोर्टर) राज्यातील शेतकर्यांवर आर्थिक संकट आलेलं असताना राज्यातलं शिंदे-फडणवीस सरकार शेतकर्यांकडे दुर्लक्ष करत आहे. कापूस, सोयाबीन, कांद्याला भाव नसल्याने कापूस, सोयाबीन घरात पडून आहे तर कांदा शेतात सडत आहे. हा महत्वपुर्ण मुद्दा उपस्थित करत विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला आज घेरले. गळ्यात कांद्याच्या माळा, डोक्यावर टोपली घेत अजित पवारांसह धनंजय मुंडे, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे यांच्यासह आघाडीतील सर्वच आमदारांनी विधिमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन केले. तर तिकडे विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे पहावयास मिळाले. मुख्यमंत्री बोलत असताना विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. प्रचंड गदरोळ वाढल्याने विधानसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून शेतकर्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. डोक्यावर कांद्याची टोपली घेऊन, गळ्यात कांद्याच्या माळा घालून आमदारांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार हेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, आदित्य ठाकरे यांच्यासह आघाडीतील सर्वच आमदारांनी या वेळी आक्रमक भूमिका घेत कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, अशी घोषणाबाजी केली. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी बार्शी तालुक्यातील झाडी बोरगांव येथील एका शेतकर्याने कांदा विकल्यानंतर केवळ 1 रुपयांचा चेक आडत व्यापार्याकडून शेतकर्यास देण्यात आला होता. संबंधित व्यापार्यावर बाजार समितीने कारवाईही केली. मात्र, हा मुद्दा राज्यभर गाजला, त्यानंतर विरोधकांनी कांद्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. कांद्याला भाव मिळाला पाहिजे, अशी भूमिका विरोधकांनी घेतलीय. पायर्यांवर आंदोलन केल्यानंतर विधानसभेत कांद्याच्या मुद्यावरून विरोधक आक्रमक झाले. या वेळी विरोधकांनी शेतकरी अडचणीत आहे, त्याच्या कांद्याला भाव मिळत नाही, शेतकर्यांना दोन रुपयाचा धनादेश मिळतो हे दुर्दैव आहे, त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करत आहेत. यामध्ये सरकारने हस्तक्षेप करून शेतकर्यांना दिलासा द्यायला हवा, यापुर्वी कांद्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी 300 कोटी रुपयांचा कांदा विकत घेतला होता. त्याप्रमाणे या सरकारने नाफेडला कांदा विकत घ्यायचे आदेश द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भूमिका स्पष्ट करताना, आम्ही कांदा उत्पादक शेतकर्यांच्या पाठिशी ठामपणे उभा असल्याचे स्पष्ट केले. ज्या वेळेस मुख्यमंत्री बोलत होते त्यावेळेस विरोधकांनी प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले. दोन्ही गटात तुंबळ खडाजंगी झाल्याने विधानसभा अध्यक्षांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.