बीड (रिपोर्टर) नगर रोडहून येणार्या एका ट्रकला वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्याने अडवले. लायसेन्स दाखविले नाही म्हणून ट्रक चालकाला मारहाण करण्यात आली. सदरील हा मारहाणीचा प्रकार नगर रोडवरील काही चालकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन याबाबत वाहतूक शाखेच्या कर्मचार्यांना जाब विचारला. दंड आकारूनही चालकास मारहाण करण्याचा तुम्हास अधिकार आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे वाहतूक पोलीस आणि चालकास चांगलीच वादावादी झाली. हा प्रकार न्यायालयसमोर घडला.
आज सकाळी नगर रोडहून बसस्थानकाकडे एक ट्रक येत होता. न्यायालयासमोर वाहतूक शाखेच्या दोन पोलिसांनी ट्रक अडविला. लायसेन्स दाखविले नाही म्हणून चालकास मारहाण केली. विशेष करून ऑनलाईन दंड आकारूनही मारहाण करण्यात आल्याने चालक चांगलाच संतापला. चालकाने याबाबत पोलिसांना जाब विचारला. लाख रुपये दंड द्या पण मारता का? असा प्रतिप्रश्न उपस्थित केला. हा प्रकार बाजुलाच असलेल्या चालकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पोलिसांनी केलेल्या चुकीबाबत प्रश्न उपस्थित केला. एखाद्यास अशा पद्धतीने मारहाण करणे योग्य नाही, असा जाब पोलिसांनी विचारल्यानंतर पोलीस आणि चालकात चांगलीच वादावादी झाली. दरम्यान चालकाने शिवीगाळ केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. चालकाने शिवीगाळ केली म्हणून आम्ही मारलं, असं वाहतूक शाखेच्या पोलिसांचं म्हणणं होतं.