12 घरांवरील पत्रे उडाले, सहा जण जखमी
बीड (रिपोर्टर) मार्च महिन्यामध्ये अवकाळीसह मराठवाड्यामध्ये गारपीटीचा जबरदस्त तडाखा बसला होता. याचे पंचनामे होत नाही तोच कालपासून पुन्हा अवकाळी पावसाने मराठवाड्याला चांगलेच झोडपून काढले. पावसासह वारा आणि गारपीट झाली. यात आंबा, मोसंबी, ज्वारी, गहू, हरभरा, भाजीपाला यासह इतर पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. वीज पडून दोन दिवसात सात नागरिकांचा व 17 जनावरांचा मृत्यू झाला. 12 लोकांच्या घरावरील पत्रे उडाल्याने यात सहा जण जखमी झाले. नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्यास आजपासून सुरुवात झाली. या अवकाळीने 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेत पिकांचे नुकसान झाले.
शेतरकर्यांना नेहमीच कुठल्या ना कुठल्या संकटाशी दोनहात करावे लागते. मार्च महिन्यामध्ये अवकाळी पावसासह गारपीट झाली होती. यात मराठवाड्यातील शेकडो हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले होते. याचे पंचनामे पुर्ण होत नाही तोच गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा अवकाळी पाऊस पडू लागला. काल सकाळी आणि सायंकाळी अनेक ठिकाणी गारपीट झाली. या पावसाने आंब्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. गहू, हरभरा, भाजीपाला, टरबुज, खरबुज, ज्वारी यासह आदी पिकांचे नुकसान झाले. वादळी वार्यात वीजा पडून सात नागरिकांचा मृत्यू झाला. लहान-मोठे 17 जनावरे दगावले आहेत. 12 नागरिकांच्या घरांवरील पत्रे उडाल्याने यात सहा जण जखमी झाले. 33 टक्क्यांपेक्षा जास्त हेक्टरवरील पिकांचा नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज सकाळपासून पंचनाम्याला सुरुवात करण्यात आली असून तलाठी प्रत्येक गावात गेलेले होते.
नुकसानीचा अहवाल येताच राज्य शासनाला पाठवला जाईल
कालपासून बीड जिल्ह्यात गारांसह वादळी पाऊस झाला आहे. आंबा, संतरा, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्वांचे तात्काळ पंचनामे करून तसा अहवाल तहसीलदार मार्फत जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात यावा यासाठी तलाठी आणि मंडल अधिकार्यांनी शेतात जावूनच पंचनामे करावेत, असे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी तलाठी, मंडळाधिकारी यांना दिले आहेत. त्यासोबतच कृषी सहायकांनी या पंचनाम्याच्या कामात सहभागी होण्याचे आदेश दिलेले आहेत. उद्यापर्यंत या सर्वांचा अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त होताच विभागीय आयुक्तांमार्फत राज्य सरकारला पाठविण्यात येईल असेही राऊत यांनी रिपोर्टरला बोलताना सांगितले.