चुरशीच्या महाडीक-पवार लढतीत भाजपाची सरशी; दुसर्या पसंतीने शिवसेना उमेदवाराचा पराभव
मुंबई (रिपोर्टर) सत्ताकारणाचे समीकरण पहाटेच्या प्रहरात जुळवणार्या भाजपाला राज्य सभा निवडणुकीच्या निकालातही पहाटचा मुहूर्त लाभदायी ठरला. सहा जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारत आपला तिसरा उमेदवार आघाडीतील अपक्षांची मते फोडून विजयी केल्यानंतर राज्याच्या भाजपात हर्षोल्हास झाला असून सत्ताधारी महाविकास आघाडीने आपला पराभव मान्य केला आहे. राज्यसभा निवडणुकीच्या मतमोजणीत शिवसेनेचे उमेदवार संजय राऊत, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल विजयी झाले आहे तर भाजपाचे उमेदवार अनिल बोंडे, पियुष गोयल आणि धनंजय महाडीक हे विजयी घोषीत करण्यात आले.
राज्यसभेच्या सहा जागांसाठी काल मतदान झाले. सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास मतमोजणी होऊन निकाल हाती येणे अपेक्षित असताना भाजपाने महाविकास आघाडीतील तीन मतदारांवर आक्षेप नोंदवला. हा आक्षेप राज्य निवडणुक आयोगाने फेटाळला. त्यानंतर तो आक्षेप केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आला. ज्या आक्षेपावर तात्काळ निर्णय घेणे अपेक्षित होते तो निर्णय पहाटे घेऊन मतमोजणीला सुरुवात केली. तेव्हा मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांना पहिल्या पसंतीचे 43, शिवसेना उमेदवार संजय राऊत यांना 41, काँग्रेसचे उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना 44, तर भाजपाचे अनिल बोंडे आणि पियुष गोयल यांना पहिल्या पसंतीची अनुक्रमे 48 मते मिळाली. ज्या सहाव्या जागेसाठी लढत झाली त्या जागेवर शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना 33 तर भाजपाचे धनंजय महाडीक यांना 41 मते मिळाल्याने सहावी जागा यशस्वीरित्या निवडून आणण्यात भाजपाला भाजपाला यश मिळाले. संजय पवार, धनंजय महाडीक यांच्या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली होती. दुसर्या पसंतीची मते भाजपाचे महाडीक यांना जास्त मिळाले म्हणून त्यांचा विजय झाला.