जळगाव (रिपोर्टर) राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे डेथ वॉरंट तयार आहे. आता फक्त त्यावर कोण आणि कधी सही करणार, हे ठरणे बाकी आहे. येत्या 15 दिवसांमध्ये हे सरकार कोसळेल, असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले. ते रविवारी जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. जळगावच्या पाचोर्यात आज ठाकरे गटाची महासभा आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेची संपूर्ण तयारी झाली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत दोन दिवसांपासून जळगावात असून सभेच्या तयारीचा आढावा घेत आहेत.
आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावरही निशाणा साधला. आमच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, असे विखे-पाटील यांनी म्हटले होते. त्यावरुन संजय राऊत यांनी विखे-पाटलांचा समाचार घेतला. लग्न एकाबरोबर आणि संसार दुसर्या बरोबर करणे, योग्य नाही. तुमच्या मनात कोणी असेल अन तुम्ही दुसर्याबरोबर नांदताय हा तर व्यभिचार आहे. देवेंद्र फडणवीस हे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मनातील मुख्यमंत्री असतील तर त्यांनी फडणवीसांच्या गळ्यात मंगळसूत्र बांधावे. त्यांच्या मनात दुसरे मुख्यमंत्री असतील तर त्यांनी त्यांना बसवा, असे संजय राऊत यांनी म्हटले. विखे पाटलांनी खूप वेळा कन्फ्यूज केले आहे. आधी ते काँग्रेस पक्षात होते मग ते शिवसेनेत आले. शिवसेनेत मंत्री पद उपभोगली, त्यानंतर दुसर्या मग तिसर्या पक्षात गेले. त्यांच्या भूमिकांमध्ये गोंधळ आहे. उद्या राज्यात सत्तापालट झाल्यास राधाकृष्ण विखे-पाटील आणखी एखाद्या पक्षात जातील, असे संजय राऊत यांनी म्हटले.
गुलाबराव पाटलांवर राऊतांची टीका
सुवर्णनगरीतले काही दगड आमच्या सोबत होते, मात्र ते दगडच निघाले, अशी टीका संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर केली. कोरोना काळात लोकांचे प्राण जात असताना जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मंत्री गुलाबराव पाटील यांनी 400 कोटी रुपयाचा घोटाळा केला आहे. त्याची कागदपत्रं माझ्या जवळ असल्याचा आहेत. विधानसभेत व विधान परिषदेत याबद्दल प्रश्न उपस्थित झाले. मात्र, हे प्रकरण दाबण्यात आले, असा आरोप संजय राऊत यांनी केला.