जमीनीचा फेरफार केला नाही
मंडल अधिकार्यासह तलाठ्यावर गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
बीड (रिपोर्टर) उमरद खालसा येथील जमीन प्रकरणी फेरफार करण्याची विनंती एका शेतकर्याने वेळोवेळी मंडल अधिकार्यासह तलाठ्याकडे केली होती मात्र संबंधिताने फेरफार केला नसल्याने शेतकर्याने थेट कोर्टाचे दार ठोठावले होते. न्यायालयाने शेतकर्याच्या बाजुने न्याय देत फेरफार न करणार्या मंडल अधिकार्यासह तलाठ्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली.
उमरद खालसा येथील गट नं. 129 मध्ये 6 हेक्टर 54 आर जमीन आहे. यापैकी 5 हेक्टर जमीनीचे खरेदीदार प्रकाश मनोहरराव कुलकर्णी हे आहेत. सदरील मिळकत त्यांनी मुळमालक पद्माकर गोपाळराव रामरूप यांच्याकडून सन 2010 मध्ये खरेदी केलेली आहे. मिळकत खरेदी करण्यापूर्वी त्या जमीनीचा कुळ म्हणून सन 1974 पासून खरेदीच्या दिवसापर्यंत काबीज होता व खरेदी तारखेपासून तो मालकी हक्काने काबीज आहे. कुलकर्णी यांनी वेळोवेळी खरेदी केलेल्या मिळकतीच्या अभिलेखात त्यांचे नाव लावण्यासाठी तलाठी गुरसाळी यांच्याकडे विनंती केली. त्यांनी याची दखल घेतली नाही म्हणून दि. 17-10-2020 रोजी तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून अभिलेखावर त्यांच्या नावाची नोंद होण्यासाठी आवश्यक ते फेरफार करण्यासाठी अर्ज केला त्याचवेळी तलाठी गुरसाळी यांच्याकडे फिर्यादीने अर्ज दिला होता. गुरसाळी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरील गट नं. 129 ही मिळकत भोगवटदार क्र. 2 अशी वर्गीकृत झालेली असल्याने फेरफार करण्यास व सक्षम अधिकार्यापुढे ठेवण्यास असमर्थता दर्शविली. महसूल विभाग याबाबत कुठलीही भूमिका घेत नसल्याचे पाहून प्रकाश कुलकर्णी यांनी न्यायालयाचे दार ठोठावले आणि न्यायालयाने याबाबत कुलकर्णी यांच्या बाजुने निकाल देत फेरफार करण्यास टाळाटाळ करणार्या महसूल विभागाला चांगलेच वठणीवर आणण्याचे काम केले. अजय बापुराव मोराळे (तलाठी), पुष्पा भगवानराव राख (मंडल अधिकारी) व धर्मराज विठ्ठलराव देशमुख (मंडल अधिकारी) यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्याचे आदेश पिंपळनेर पोलिसांना दिले आहे. सदरील हे प्रकरण सहायक अधिक्षक मुख्य न्यायदंडाधिकारी आठव्या कोर्टात सुरू होते.