मातब्बरांची प्रतिष्ठा अन् कार्यकर्त्यांचे भविष्य चार वाजता मतपेटीत होणार बंद
मतदान केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त, परळीत भाऊ-बहीण मतदान केंद्रावर, बीडमध्ये काका-पुतण्याचे मतदान केंद्रावर ठाण
बीड/परळी/अंबाजोगाई/केज/वडवणी (रिपोर्टर) बीड जिल्ह्यातील पाच कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. मातब्बरांनी प्रतिष्ठा लावून ठेवलेल्या या निवडणुकांकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून असून खासकरून बीडमधील काका-पुतण्याच्या राजकीय लढाईत कोण भारी ठरतो याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. आज दुपारी एक वाजेपर्यंत बीड 64, परळी 48, अंबाजोगाई 50, केज 80, वडवणी 70 तर गेवराईत 60 टक्के मतदान झाले होते. सायंकाळी चार वाजता मातब्बरांची प्रतिष्ठा आणि उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे.
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी बीड शहरात दोन तर मांजरसुंबा, पिंपळनेर येथे मतदान केंद्र उभारण्यात आले आहे. मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त असून कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीत दस्तुरखुद्द माजी मंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आ. अमरसिंह पंडित, बदामराव पंडित, आ. लक्ष्मण पवार, केशव आंधळे, सुरेश धस हे मतदान केंद्रांवर ठाण मांडून बसल्याचे दिसून आले.
बीड कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी काका विरुद्ध पुतण्याने विरोधकांची मोट बांधत मोठे आव्हान उभे केल्यानंतर या निवडणुकीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष बीड बाजार समितीकडे असून आज सकाळपासून बीडच्या दोन मतदान केंद्रांसह पिंपळनेर आणि मांजरसुंबा येथील मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. आ. संदीप क्षीरसागर हे सकाळी पिंपळनेर येथील मतदान केंद्रावर ठाण मांडून होते तर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे या निवडणुकीकडे लक्ष ठेवून दिसून आले. उत्स्फूर्तपणे मतदान प्रक्रिया सुरू असून मतदान केंद्रावर कुठलाह अनुचीत प्रकार घडू नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुपारपर्यंत सहकारी संस्था मतदारसंघात 1755 मतांपैकी 1068 मतदान झाले होते. ग्रामपंचायत मतदारसंघातून 1434 पैकी 941 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. व्यापारी आडसत मतदारसंघात एकूण मतदान 356 असून 260 मतदारांनी आपल्या मताचा हक्क बजावला तर हमाल तोलार मतदारसंघातून 158 मतदारांपैकी 129 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारपर्यंत 64 टक्केपर्यंत मतदान झाले. तर इकडे वडवणीत 18 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात असून त्यासाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथील मतदान केंद्रावर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दुपारपर्यंत 70 टक्के मतदान झाले होते. सकाळी आ. प्रकाश सोळंके हे वडवणी येथे तळ ठोकून होते. तर दुसरीकडे गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी कन्या प्रशाला या ठिकाणी मतदान केंद्र उभारण्यात आले असून त्याठिकाणी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारपर्यंत गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 64 टक्के मतदान झाले होते. पावसामुळे मतदानाचा वेग मंदावला होता. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. दस्तुरखुद्द माजी मंत्री धनंजय मुंडे हे भल्या सकाळी मतदान केंद्रावर उपस्थित होते. पंकजा मुंडे याही मतदान केंद्रावर दिसून आल्या. दुपारपर्यंत परळीमध्ये 40 ते 45 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येते. तिकडे अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान होत असून त्याठिकाणी 50 टक्केच्या वर मतदारांनी आपल्या मताचा हक्क बजावला होता. केज कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी 80 टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येते. सर्वच मातब्बरांनी ताकद पणाला लावल्याने मतदान केंद्रावर कुठलाही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.