विरोधकांच्या बहुतांशी उमेदवारांचे डिपॉझिट गुल
गेवराई (रिपोर्टर) ‘पंडितमुक्ती’चा नारा देणारे गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत माजी मंत्री बदामराव पंडितांशी हातमिळवणी करत माजी आ. अमरसिंह पंडित यांना आव्हान उभे केले खरे मात्र निवडणूक निकाला दरम्यान गेवराई बाजार समिती पुन्हा एकदा अमर ठरत ती माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या ताब्यात गेली. या ठिकाणी अमरसिंह पडितांचे सर्वचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून लक्ष्मण पवार यांच्या गटाच्या बहुतांशी उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले.
गेवराईची कृषी उत्पन्न बाजार समिती ही माजी आ. अमरसिंह पंडित यांच्या ताब्यात होती. सदरची बाजार समिती आपल्या ताब्यात यावी यासाठी भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी प्रयत्नांची परिकाष्ठा करत अमरसिंह पंडितांविरोधात आव्हान उभे करण्याइरादे माजी मंत्री बदामराव पंडितांची मदत घेतली. गेवराई पंडितमुक्तीचा नारा देणारे लक्ष्मण पवारांनी एका पंडिताचीच मदत घेतल्याने ही अभद्र युती असल्याचा आरोप अमरसिंह गटाने केला. दोन्ही गटांकडून जोरदार प्रचार झाल्यानंतर काल 17 जागांसाठी मतदान झाले. तत्पूर्वी एका जागेवर अमरसिंहांचा उमेदवार बिनविरोध निवडून आला होता. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीपासूनच अमरसिंह पंडित गटाचे सर्वचे सर्व उमेदवार आघाडी घेऊन होते. सरशेवटी मोठ्या मताधिक्याने अमरसिंह पंडित गटाचे उमेदवार विजयी झाले तर लक्ष्मण पवार गटाच्या बहुतांशी उमेदवारांचे या निवडणुकीमध्ये डिपॉझिट जप्त झाले. एकप्रकारे गेवराईत लक्ष्मणाला बदामाची शक्ती लागली अन् गेवराईचा बाजार हा अमर ठरला. अमरसिंह पंडित गटाला 90 टक्क्यांच्या आसपास या निवडणुकीमध्ये जबरदस्त मतदान मिळाले. अमरसिंह पंडित गटाचे उमेदवार विजयी झाल्यानंतर समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला.