पाटोद्यात भाजपा कार्यकर्ते-पोलिसात झटापट
सौम्य लाठीमार : काही काळ वातावरण तंग; आ. धसांच्या मध्यस्थीने मतदान प्रक्रिया शांततेत सुरू, दुपारी एक वाजेपर्यंत 80 टक्के मतदान
पाटोदा (रिपोर्टर) पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान सुरू असून पोलीस आणि कार्यकर्त्यात वाद निर्माण झाल्याने पोलिसांनी मतदान केंद्रावर सौम्य लाठीमार केला. त्यामुळे पाटोद्यातील मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शेवटी आमदार सुरेश धस यांनी कार्यकर्ते आणि पोलिसात मध्यस्थी केली त्यामुळे पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू झाली असून दुपारपर्यंत मतदान केंद्रावर 80 टक्के मतदान झाले होते.
पाटोदा कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी शहरातील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये मतदान केंद्र उभारण्यात आले असून आज सकाळपासून त्याठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीत आ. सुरेश धस यांचे एक पॅनल असून दुसरे पॅनल बांगर यांचे आहे. आज सकाळच्या दरम्यान जेव्हा मतदान सुरू होते तेव्हा आतमधील भाजपाचे पोलिंग एजंट हे सातत्याने आत-बाहेर येत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना हटकले, त्यातून कार्यकर्ते आणि पोलिसात वाद झाला. तेव्हा पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शेवटी आ. सुरेश धस यांनी मध्यस्थी करत पोलिस आणि कार्यकर्त्यांमधील वाद मिटवला. दुपारी एकनंतर पुन्हा मतदान प्रक्रिया सुरळीत झाली.