बीड (रिपोर्टर) कुठल्याही राजकीय पक्षाला निवडणुकात जय मिळवायचे असेल तर निवडणुकीतील व्यूहरचनेसह निवडणूकपुर्व संघटनात्मक ताकतीची अत्यावश्यकता असते. ज्यांच्याकडे निवडणूकपुर्व संघटन शक्ती प्रबळ असते त्या पक्षाचा कुठल्याही निवडणुकीत दणदणीत विजय पहायला मिळतो. बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद राजेश्वर चव्हाण यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी गेल्या दोन वर्षाच्या कालखंडात जिल्हाभरात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचे विचार घराघरात पोहचवत मोठे संघटन उभे केले. त्या संघटनाच्या बळावर जिल्हाभरात राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी ताकत मिळाली आणि यश प्राप्त झाले त्यापाठोपाठ काल-परवा झालेल्या जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतही त्याचा मोठा फायदा होत सर्वाधिक बाजार समित्या या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आल्या. राजेश्वर चव्हाण यांच्या संघटन कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून बीड जिल्ह्याकडे पाहितले जात असले तरी या ठिकाणी राष्ट्रवादीला प्रतिआव्हान देणार्या भाजपाला संघटनातून रोखणे नितांत गरजेचे असते. बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि विद्यमान आमदारांचे त्या त्या मतदारसंघात प्राबल्य अधिक पहायला मिळते. असे असताना पक्षीय पदाधिकार्यांसह कार्यकर्त्यांची मोट बांधणे आणि पक्षाच्या विचारासोबत त्यांना कायम ठेवणे हे अधिक महत्वाचे असते. राजेश्वर चव्हाण हे संघटन कौशल्यात अधिक प्रभावी असल्याचे गेल्या दोन वर्षाच्या कालखंडात दिसून आले आहे. पक्षाच्या विचारासह राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांचे विचार सर्वसामान्यातील सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केल्याचे दिसून येते. जिल्हाध्यक्ष या भूमिकेत गाव पातळीवर कार्यकर्त्यांसोबत सातत्याने घेण्यात येत असलेल्या बैठका पक्ष वाढीसाठी शाखांची स्थापना आणि लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पक्षाच्या वतीने उभारलेली टीम ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते, पदाधिकार्यांना एकसंघ तर ठेवतेच परंतु जास्तीत जास्त कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या विचाराखाली यामुळेच येतात. याबाबतही दुमत असण्याचे कारण नाही. म्हणूनच राजेश्वर चव्हाण हे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामपंचायत निवडणुकीसह बाजार समितीच्या निवडणुकीतही घवघवीत यश प्राप्त झाले आहे. राष्ट्रवादी नेत्यांना आणि मतदारसंघातील आमदारांच्या मेहनतीला जेवढे महत्व आहे त्यामध्ये राजेश्वर चव्हाण यांच्या संघटन कौशल्याचा खारीचा वाटा नक्कीच आहे.