Friday, August 6, 2021
No menu items!
Homeसंपादकीयअग्रलेख- षडयंत्री काळाच्या चक्रव्युहात पंकजा

अग्रलेख- षडयंत्री काळाच्या चक्रव्युहात पंकजा


गणेश सावंत
मो. नं. 9422742810

साक्षात काळालाही विजयी मिरवणुकीत गुलालाची उधळण करत नाचावयास भाग पाडणारे गोपीनाथराव मुंडे यांचे राजकारण हे समाजकारणाच्या जोरावर अधिक होते. त्या समाजकारणातून गोपीनाथरावांजवळ अखंड बहुजन समाज एकवटत असायचा. त्यांच्या त्या समाजकारणी राजकारणामुळेच कधीकाळी जो पक्ष बेण्यालाही नव्हता त्या पक्षाचा वटवृक्ष केवळ आणि केवळ गोपीनाथरावांसारख्या नेतृत्वामुळेच झाला. हे सुर्यप्रकाशाइतकं सत्य कोणालाही नाकारता येणार नाही. जसं यश इ.स. 1995 साली गोपीनाथरावांनी महाराष्ट्रात आणून दाखवलं तसं राष्ट्रीय भाजपात परिवर्तन सुरू झालं. नवं नेतृत्व स्वीकारलं गेलं अन् 2014 च्या निवडणुकीत नमो नमो चा गजर होत राज्यात आणि देशात भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं. महाराष्ट्रातून बहुतांशी खासदार निवडून आणण्यासाठी गोपीनाथरावांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र दुर्दैवाने पुढे मंत्रिमंडळाच्या शपथविधी आधीच गोपीनाथरावांचा अपघात झाला आणि त्यात त्याचां दुर्दैवी मृत्यू झाला. हे सर्वसामान्यांना तर सोडा साक्षात काळालाही मान्य नव्हते. गोपीनाथरावांचा मृत्यू स्वीकारणे कोणालाही शक्य नव्हते. परंतु ते सत्य होते आणि ते स्वीकारलेही. पुढे त्यांच्या जेष्ठ कन्या पंकजा मुंडे यांनी दुखांकित काळात आपल्या पित्याचा वारसा पुढे चालवण्या हेतू अन् गोपीनाथरावांवर प्रेम करणार्‍या सर्वसामान्यातील सर्वसामान्य माणसांच्या पाठिशी उभा राहण्यासाठी पुढे समाजकारणाचं राजकारण करणार असं म्हणत पंकजांनी अखंड महाराष्ट्रात यात्रा काढली. परंतु जसेच गोपीनाथराव महाराष्ट्राला सोडून गेले तसे महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर भारतीय जनता पार्टीत स्थित्यांतरे घडत राहिले. ज्या बहुजनांच्या जोरावर भाजप वाडी-वस्ती-तांड्यात आणि गावागावात पोहचला त्या महाराष्ट्रात
भाजपाने
नेतृत्व बदललं

संघाच्या मुशीत आणि कुशित खेळलेले षडयंत्री दाव टाकण्यात पटाईत असलेले, राजकारणात नवखे असलेले देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा समोर आणण्यात आला आणि त्यांना मुख्यमंत्री करण्यात आले. इथेच भारतीय जनता पार्टी आणि बहुजनात ठिणगी पडली. ही ठिणगी एवढी छोटी होती, ती अत्यंत डोळसांना सुरुवातीलाच दिसाची. परंतु सत्तेच्या धुंदीत मदमस्त असलेल्या भाजपातीलच बहुजन नेतृत्वाला ती ठिणगी दिसून येत नव्हती. ती केवळ स्वत:च्या डोक्यावर असलेल्या लाल दिव्यामुळे. महाराष्ट्र भाजपाने पदरात लाल ठिणगी घेतली हे भाजपाच्या अन्य नेत्यांना दिसायचे परंतु स्वत:च्या डोक्यावरच्या लाल दिव्यामुळे त्या ठिणगीकडे ते सातत्याने दुर्लक्ष करायचे परंतु संघर्ष करण्याची कुवत असणार्‍या भाजपातले काही नेते त्याकडे दुर्लक्ष करत नव्हते. त्यातले एकनाथ खडसे हे एक. परंतु एकनाथ खडसेंनी लक्ष दिले म्हणून मोदी-शहा-फडणवीस भाजपेयींनी त्यांचे काय हाल केले हे स्पष्ट झाले. खडसेंना जी ट्रिटमेंट उघडपणे दिली जात होती तीच ट्रिटमेंट परंतु गुपचुप पंकजा मुंडेंना महाराष्ट्र भाजप देत होता. हे पंकजांना अनेक वेळा दिसूनही आलं. एकतर त्या ट्रिटमेंट बाबत पंकजांनी तेव्हाच तात्काळ आवाज बुलंद करायला हवा होता. नाही तर मग मोदी-शहा-फडणवीस यांची जी भाजप आहे किंवा त्यांची जी विचारसरणी आहे ती त्यांनी स्वीकारायला हवी होती. परंतु असं न करता पंकजांनी ‘भाजप माझा आहे, मी भाजप सोडणार नाही, पक्षाला काय करायचं ते करू देत’ या आत्मविश्वासी परंतु आव्हानस्वरुप भाषेचा वापर सातत्याने केला आणि इथच पंकजा मुंडेंचा घात झाला. कारण आजची जी भाजप आहे ते बहुजनांची म्हणण्यापेक्षा कष्टकरी, कामगार, शेतकरी, शेतमजूर , दिनदुबळे , वंचित यांचे प्रश्न समजून घेणारी नाही. त्यांच्या प्रश्नाविषयी कणव या भाजपेयीत नाही हे गेल्या सात-आठ वर्षांच्या कालखंडामध्ये दिसून आलेलं आहे. अशा परिस्थितीत भाजपमध्ये राहून भाजपाच्या मनुस्मृती सदृश्य कायद्याला आणि भूमिकेला आत राहून स्पष्टपणे विरोध करता येणार नाही हे उघड असल्याने पंकजांना आजपर्यंत जाहीर भूमिका घेताच आली नाही. यामध्ये अनेक ठिकाणी पंकजांच्या चुका झाल्या हे कुणीही सांगेल. माझे पिता, माझा बाप, माझा पक्ष,
माझ्या बापाचा पक्ष

हा भाजप आहे, हे छातीठोकपणे सांगताना पंकजा मुंडे कुठेही कमी पडत नाही आणि भाजप हा नक्कीच गोपीनाथराव मुंडेंचा पक्ष आहे. त्यांनीच सेठजी-भटजींच्या पक्षाला बहुजनांची झालर लावत मोठं केलं आहे हे तेवढेच खरे असले तरी हेही तेवढेच सत्य आहे जेव्हा एखादी संस्था मोठी होते तेव्हा त्या संस्थेला माणसांची गरज नसते. जेव्हा संस्था ही छोटी असते तेव्हा त्या संस्थेला माणसाची गरज असते नंतर माणसांनाच संस्थेची गरज पडते. आजही तेच आहे भाजप हा अगडबंब पक्ष झाला आहे, तिथे आता माणसांना महत्व नाही हे पंकजा मुंडेंना उमजून यायला हवं. भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्रातीलच नेते आपले खच्चीकरण करत असतील तर त्याविरुद्ध राष्ट्रीय नेतृत्वाकडे तक्रार करून लोकांसमोरही अशा लोकांना उघडे पाडायला हवे होते. अनेक वेळा पंकजांच्या बाबतीत पक्षातीलच एका गटाने षडयंत्र रचले. ते उघड झाले. मात्र जेव्हा जाहीर भाष्य करताना पंकजा ‘असं काही नाही, पक्ष मला संपवायला निघाला असं मला वाटत नाही, हा माझ्या बापाचा पक्ष आहे, या पक्षासाठी मी काय काय नाही केले, माझ्या पायाला किती फोडे आले’ हे सांगण्यात दंग होतात परंतु षडयंत्रकारी कोण? हे महाराष्ट्राला सांगत नाहीत, देशाला सांगत नाहीत आणि आपल्या माणसांनाही सांगत नाहीत. त्यामुळे पंकजा मुंडेंना नेमके करायचे काय आहे? हे त्यांच्या कार्यकर्त्यांच्याही लक्षात येत नाही. त्याचा फायदा पंकजा मुंडेंचे विरोधक असणार्‍या षडयंत्रकार्‍यांना होत आला. गेल्या दोन वर्षांच्या कालखंडामध्ये ज्या काही कुरघोड्या झाल्या त्या कुरघोड्यामधली ताजी कुरघोडीही केंद्रिय मंत्रिमंडळामध्ये प्रितम मुंडेंना डावलणे ही होती. पंकजांचा पराभव, त्यानंतर विधान परिषद नाकारणं, राज्यसभेवर पंकजांना नको असणार्‍या व्यक्तीला घेणं, अन् त्या पाठोपाठ प्रितम मुंडेंना दिल्ली दरबारी मानाचं स्थान न देणं हा
मुंडेंचा अपमान

नक्कीच मानला जाईल आणि त्याचा राग मुंडे समर्थकांमध्ये नक्कीच असेल यात दुमत असण्याचं कारण नाही. ठिक आहे प्रितम मुंडे यांना मंत्रीपदावर भारतीय जनता पार्टीला घ्यायचे नव्हते, हरकत नाही परंतु पंकजा मुंडेंनी ज्या व्यक्तीच्या खासदारकीलाच विरोध केला होता त्या व्यक्तीला मंत्रीपदावर घेऊन भाजपाला नेमकं काय दाखवून द्यायचं. पंकजा मुंडे म्हणत असतील, भाजप आपल्याला संपवत नाही तर मग ही भाजपाची नेमकी खेळी कुठली? हे षडयंत्र नव्हे काय? असे एक ना अनेक प्रश्न महाराष्ट्रातील भाजपातील कार्यकर्त्यांना पडले असतील तेवढेच स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंच्या अनुयायांना पडले असतील. इथे स्पष्टपणे भारतीय जनता पार्टी पंकजा मुंडेंवर अन्याय करतील हे एक सुरामध्ये म्हटले जाईल, परंतु हा अन्याय करण्याचे आणि पंकजांच्या विरोधात षडयंत्र रचण्याचे धाडस त्या भाजपेयीत का आले ? याचा शोध नक्कीच घ्यायला हवा. कारण पंकजा मुंडे यांनी जेव्हापासून स्व. मुंडेंचे आशीर्वाद घेऊन समाजाचे आणि बहुजनांचे नेतृत्व केले त्या कालखंडात पंकजा मुंडेंच्या कार्यपद्धतीवर किती लोक नाराज झाले, ती कार्यपद्धत योग्य होती का? याचे आत्मपरिक्षण करणेही आज मितीला गरजेचे आहे. काल परवा बीड येथील एका कार्यक्रमात पंकजा म्हणाल्या, ‘मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भेट घेत नाही, असं बोलून मला उगीच बदनाम केलं,’ हेच वाक्य आणि हाच बदल पंकजा यांच्यात विधान सभा निवडणुकीपुर्वी असता तर हे दस्तुरखुद्द भाजपाच्याच कार्यकर्त्यांनी तेही ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं. आज जी भाजपामध्ये पंकजांना चोहो बाजुने वेठीस धरण्याचा प्रयत्न होतोय तो केवळ आणि केवळ पंकजा हे बहुजनांचं नेतृत्व आहे. त्यांच्या पाठिशी एक समाज आहे आणि तो कधीही आपल्याला गिळंकृत करेल ही जी भीती भाजपामधल्याच टक्क्यातील कमी लोकांना वाटते. त्यातूनच हा सर्व प्रकार घडून येतो आणि गेल्या दोन वर्षांच्या कालखंडामध्ये
षडयंत्री चक्रव्यूह
भाजपमध्ये आखलं जात होतं. दुसरीकडे पराभवाच्या रागाने पंकजांनी लोकांना दुर्लक्षित केलं होतं. इथच अंतर्गत विरोधकांच्या दुष्टचक्रात पंकजा अडकत गेल्या. काल प्रितम यांना डावलल्यानंतरही पत्रकार परिषद घेऊन जे स्पष्टीकरण पंकजा यांच्याकडून देण्यात आले त्या स्पष्टीकरणात उघडपणे महाराष्ट्र भाजपातील काही नेत्यांबद्दल नाराजगी होती. त्या नाराजगीचे पडसाद बीड जिल्ह्यात उमटत गेले. पदाधिकार्‍यांनी राजीनामा सत्र सुरू ठेवले, त्याचे लोण महाराष्ट्रात पसरूही शकते. आज पंकजा दिल्ली दरबारी आहेत, तिथे यावर भाष्य होईलच. परंतु षडयंत्री चक्रव्युहातून अभिन्यूगत होईल की, चक्रव्युह भेदण्यात पंकजांना यश येईल हा काळच सांगेल. परंतु मुंडे-महाजनांची भाजप आणि मोदी-शहा-फडणवीसांच्या भाजपमध्ये जमीन-आस्मानचा फरक आहे. तो फरक ज्या दिवशी पंकजांना उमजेल त्या दिवशी एकतर ती भाजप त्यांना स्वीकारावे लागेल नाही तर मुंडे-महाजनांच्या भाजपाच्या विचारधारेवर बंड करावं लागेल.

ताज्या बातम्यांसाठी टेलीग्रामवर आमचं चॅनेल (@beedreporter) जॉइन करा येथे क्लिक करा आणि महत्त्वाच्या न्यूज अपडेट मिळवा.

Most Popular

error: Content is protected !!