पिछाडीवरचा भाजप 65 वर
काय चुकलं ते पाहू, लोकसभेत पुन्हा येऊ -बोमय्या
भाजपाने ऑपरेशन लोटसवर भरपूर पैसा
खर्च केला -काँग्रेस नेते सिद्धरामय्या
पराभव मान्य-केंद्रीय मंत्री राजू चंद्रशेखर
बंगळुरू (रिपोर्टर) कर्नाटकात भारतीय जनता पार्टी निवडून आली नाही तर जातीय दंगली होतील, असा निर्वाणीचा इशारा देणारे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना आणि ‘बजरंग बली की जय’ चा नारा देत मतदान करा, म्हणणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कर्नाटकातल्या जनतेने जबरदस्त हाबाडा देत जात-पात-धर्म-पंथा च्या आणि भावनेच्या राजकारणापेक्षा उद्योग, व्यवसाय, बेरोजगारी, महागाई या महत्वपूर्ण मुद्यांना महत्व देत भाजपाला कर्नाटकात पुर्णत: नाकारले. त्यामुळे आजच्या विधानसभा निकालामध्ये काँग्रेसने प्रचंड मुसंडी मारली असून दुपारी दीड वाजेपर्यंत कर्नाटकात काँग्रेसच्या जागा बहुमतापेक्षा जास्त 133 ठिकाणी आघाडीवर होत्या तर भाजपा पुर्णत: 65 ने पिछाडीवर दिसून आला. जेडीएस 22 जागांवर आघाडी घेऊन होता. तर अन्य अपक्ष 4 जागांवर आघाडी घेऊन पहावयास मिळाले.
देशामध्ये प्रचंड महागाई, बेरोजगारी आणि वेगवेगळे महत्वाचे प्रश्न आ वासून उभे असताना निवडणुकांच्या दरम्यान केवळ जात-पात-धर्म-पंथ आणि भावनेच्या जोरावर राजकारण करत सत्ताकारणाचे गणित जुळवणार्या भाजपाला कर्नाटकाच्या जनतेने जबरदस्त हाबाडा दिला. 224 जागांसाठी कर्नाटकमध्ये दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. 70 टक्केपेक्षा अधिक मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले. भाजपाच्या ताब्यात असलेलं कर्नाटक आज मतमोजणीच्या दिवशी मतदान यंत्र खुलताच भाजपाच्या हातातून निसटताना पहायला मिळालं. सुरुवातीपासून काँग्रेस उमेदवार याठिकाणी आघाडी घेऊन होते. भाजपाचे मुख्यमंत्री बोमय्या यांच्यासह महाराष्ट्र आणि दिल्लीच्या केेंद्रीय मंत्र्यांची फौज प्रचारा दरम्यान कर्नाटकात डेरेदाखल होती. दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक रॅली आणि सभा कर्नाटकमध्ये केल्या. बजरंग बलीचे नाव घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. जातीयवाद निर्माण होईल, विशिष्ट जातीबद्दल द्वेष निर्माण होऊन भाजपाला मतदान वाढेल यासाठी चित्रपटाची लाँचिंग आणि प्रचारही पंतप्रधानांनी केला. तर देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात काँग्रेस निवडून आले तर दंगली होतील असा इशारा दिला. मात्र कर्नटकाच्या सुज्ञ जनतेने भाजपाच्या धर्मांध विचारसरणीला मुठमाती देत काँग्रेसच्या प्रियंका गांधी यांच्या भूमिकेला आणि प्रचाराला प्रचंड प्रतिसाद दिला. दुपारी दीड वाजेपर्यंत कर्नाटकात काँग्रेस 133 जागांवर आघाडी घेऊन होती. भाजप 65, जेडीएस 22 तर अन्य 4 जागांवर आघाडी घेऊन आहेत. भाजपाचा कर्नाटकातील जनतेने दारुन पराभव केला आहे.
बीडमध्ये रविंद्र दळवी यांचा तर
अंबाजोगाईत देशमुखांचा जल्लोष
कर्नाटकामध्ये काँग्रेस पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याने काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख यांनी अंबाजोगाई शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला तर बीड शहरात काँग्रेसचे नेते रवींद्र दळवी यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटत शहरातून रॅली काढून आनंदोत्सव साजरा केला.