बीड (रिपोर्टर)- 14 ऑक्टोबर रोजी अंतरवली सराटी या ठिकाणी मराठा समाजाची न भूतो न भविष्यती अशी जाहीर सभा होत असून या सभेसाठी मराठा समाजातल्या आबालवृद्धांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, म्हणून घरोघरी तांदळाची पुडी असलेली मूळवाटी वाटली जात आहे. विवाह कार्यादरम्यान माना-पानातून दिली जाणारी मूळवाटी प्रथमच सभेसाठी निमंत्रित करण्या हेतू दिली जात आहे. यावरून सदरच्या सभेची जय्यत तयारी किती मोठी आहे हे दिसून येते.
आजपर्यंत आपण विवाह कार्यामध्ये आप्तस्वकियांना मूळवाटी दिल्याचे पाहितले होते, मात्र आता हीच मूळवाटी जाहीर सभेसाठी दिली जात आहे. अंतरवली सराटी या ठिकाणी आयोजीत मराठ्यांच्या सभेसाठी या मूळवाटीतून निमंत्रण दिलं जात आहे. एका पुडीमध्ये तांदुळ आणि त्यासोबत मराठ्यांचा योद्धा श्री मनोज जरांगे पाटील, चलो अंतरवली सराटी अशा आशयाचे मजकूर लिहिलेले एक चोटीशी पत्रिका आणि त्यावर तारीख-वेळ छत्रपती शिवाजी महाराज, जिजाऊ मॉ साहेब यांचे छायाचित्र असलेल्या या पत्रिकेने घराघरामध्ये स्थान प्रस्थापीत केले आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी 17 दिवस आमरण उपोषण केले. सरकारने जरांगे यांना एक महिन्याचा वेळ मागितला. जरांगे यांनी 40 दिवस सरकारला मुदत दिली, सरकारची मुदत 14 ऑक्टोबरला संपत असून जरांगे यांनी सरकारला दिलेली मुदत ही 24 ऑक्टोबरला संपत आहे. सरकारची मदत ज्या दिवशी संपते त्या दिवशी सराटे अंतरवलीत मनोज जरांगेंच्या उपस्थितीत प्रचंड जाहीर सभा होत असून सभेसाठी दोनशे एकरमधले पिके शेतकर्यांनी उपटून टाकले आहेत. या सभेसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने लोकांची उपस्थिती राहणार आहे.