बीड (रिपोर्टर): भाजपाने बीड लोकसभेसाठी राष्ट्रीय सचिव माजी मंत्री पंकजा मुंडेंना मैदानात उतरवल्यानंतर अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष बीड लोकसभेकडे लागून आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवसाच्या दुपारपर्यंत 40 पेक्षा अधिक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. खरी लढत ही महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडेंविरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात होत आहे. काल भाजपाची प्रचार सभा झाल्यानंतर या निवडणुकीत अधिक रंग भरला गेला असून युती आणि आघाडीकडून आपआपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होताना दिसून येत आहे. युतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या पाठिशी राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह त्यांची फलटण उभी असून मुंडे या निवडणुकीत पंकजांना निवडून आणण्यासाठी रात्रीचा दिवस करताना दिसून येत आहेत.
राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या बीड जिल्ह्यात यंदाची लोकसभा निवडणूक अनन्यसाधारण होऊ पहात आहे. दस्तुरखुद्द पंकजा मुंडे या निवडणुकीत मैदानात असल्याने अवघ्या राज्याचे लक्ष बीड लोकसभा निवडणुकीकडे आहे. आतापर्यंत बीड लोकसभेसाठी 40 पेक्षा अधिक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रामुख्याने भाजपा महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात लढत होणार आहे. वंचीतकडून अशोक हिंगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे वंचीतचा उमेदवारही चर्चेत आहे. उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल आहे. यामध्ये काही उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतील मात्र मताच्या ध्रुवीकरणासाठी एकमेकांचे मते खाण्यासाठी काही उमेदवार रिंगणात राहतील, असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे. महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी भाजपा आणि राष्ट्रवादीच्या बलाढ्य नेत्यांची फलटण उभी आहे. तर महाआघाडीचा उमेदवार आपल्या पाठिशी मतदार असल्याचे सांगत लढा देताना दिसून येतो. एकूणच आज मितीला बीड लोकसभा मतदारसंघात प्रचाराने धुरवडा उडवल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे ही निवडणूक अधिक रंगतदार होत आहे.