अंबाजोगाईच्या गिरवलीत खळबळजनक घटना
एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण
मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत पाण्याच्या
टाकीवरून तरुणाने उडी घेत केली आत्महत्या
आरक्षण मिळाल्याशिवाय शत्रुघ्नच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार नाही
अंबाजोगाई (रिपोर्टर):- एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळायलाच पाहिजे, अशा घोषणा देत पाण्याच्या टाकीवर चढलेल्या 40 वर्षीय शत्रुघ्न काशीद या व्यक्तीने शेकडो लोकांच्या उपस्थितीत आरक्षणासाठी पाण्याच्या टाकीवरून उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना तालुक्यातील गिरवली गावात घडली. या घटनेनंतर अंबाजोगाई तालुक्यातला मराठा समाज संतप्त होत आज सकाळी अकरा वाजता शत्रुघ्न काशीद यांचा पार्थीवदेह थेट शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणून ठेवत रास्ता रोको सुरू केला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, मनोज जरांगे यांचे उपोषण सुटत नाही, तोपर्यंत शत्रुघ्न यांच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाही, अशी भूमिका घेतल्याने गेल्या 3 तासांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको सुरू आहे. घटना रात्री घडल्यानंतर आज दुपारी एक वाजेपर्यंत घटनास्थळी जिल्हाधिकारी अथवा एसपी डेरेदाखल झाले नसल्याने आंदोलक अधिकच संतापलेले दिसून आले.
मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात अधिक चिघळत चालला असून आरक्षणासाठी मराठ्यांचे पोरं थेट सरणावर जात आहेत. आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे यांनी गेल्या चार दिवसांपासून पोटात पाण्याचा थेंब घेतलेला नाही. गावागावात साखळी उपोषण आणि कँडल मार्च सुरू आहेत. मराठा तरुणांनी आत्महत्या करू नये, असे सातत्याने आवाहन करण्यात येत आहे, मात्र सरकारच्या डोळेझाक धोरणामुळे तरुण टोकाचे पाऊल उचलताना दिसून येत आहेत. अंबाजोगाईपासून काही अंतरावर असलेल्या गिरवली येथील शत्रुघ्न काशीद हा चाळीस वर्षीय तरुण रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास गावातील पाण्याच्या टाकीवर चढला. त्याठिकाणी ‘एक मराठा लाख मराठा’, ‘मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’ अशा घोषणा त्यांनी दिल्या. जरांगे यांच्या उपोषणाला आपला जाहीर पाठींबा असल्याचे त्यांनी म्हटले.
या वेळी गावकर्यांसह पोलीस पाण्याच्या टाकीखाली थांबत त्यांना खाली उतरण्याबाबत विनंती करू लागले. मात्र शत्रुघ्न काशीद हे खाली आले नाहीत. रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मराठा आरक्षणासाठी काशीद यांनी थेट पाण्याच्या टाकीवरून खाली उडी मारली. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आतापर्यंत अनेक मराठा तरुणांनी सुसाईड लिहित आत्महत्या केल्या, मात्र काशीद यांनी लोकांच्या उपस्थितीत आरक्षणाला पाठींबा देत घोषणाबाजी करत पाण्याच्या टाकीवरून उडी मारत जीव दिला. या घटनेची माहिती वार्यासारखी जिल्हाभरात पसरली. रात्री काशीद यांचा मृतदेह स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आणण्यात आला. आज सकाळी संतप्त मराठा समाजाने काशीद यांचा पार्थीव छत्रपती शिवाजी चौकात सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या ठिकाणी आणला. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, मनोज जरांगे यांचे उपोषण सुटत नाही तोपर्यंत काशीद यांच्या पार्थीवदेहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत, अशी भूमिका घेत रास्ता रोको सुरुच ठेवला आहे. गेल्या तीन तासांपासून हा रास्ता रोको सुरू असून घटनास्थळावर डीवायएसपी मंगेश चोरमले तळ ठोकून आहेत.
समिती साक्ष पुरावे गोळा करत होती, मराठ्यांचे पोरं जीव देत होते
मराठा समाजाला आरक्षण मिळावं त्याचबरोबर कुणबींची जुनी वंशावळ यासाठी स्थापन करण्यात आलेली समिती रात्री साडे सहा ते सात वाजण्याच्या सुमारास बीड शहरात डेरेदाखल झाली होती. तिकडे संध्याकाळी दहा ते साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंबाजोगाईतील गिरवली गावात आरक्षणासाठी चाळीस वर्षीय तरुण पाण्याच्या टाकीवर चढतो, आरक्षणासाठी घोषणाबाजी करतो, जीव देणार असल्याचे ओरडून सांगतो, खाली शेकडो लोक आणि पोलीस आत्महत्या करू नको म्हणून त्याची विनवणी करतात, मात्र राज्य शासन आणि निरढावलेल्या केंद्र शासनाच्या धोरणांनी नैराश्य आलेला शत्रुघ्न अखेर पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन आत्महत्या करतो, इकडे सकाळी समिती अधिकार्यांच्या बैठका घेण्यत मश्गुल राहते, जिल्हाधिकारी अथवा एसपी दुपारी एक वाजेपर्यंत घटनास्थळी जात नाही, तरुणाचा मृतदेह रस्त्यावर ठेवलेला असतो हे सर्व चित्र माणुसकीला काळीमा फासणारं आणि राज्यकर्त्यांचं अपयश जगाला ओरडून सांगणारा दिसतो तेव्हा आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्रात कशी धग आहे हे स्पष्ट होते.