बीड (रिपोर्टर): गेल्या आठ दिवसांच्या कालखंडामध्ये बीड जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून वणवा भडकलेला असताना आपआपल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तो वणवा अधिक भडकू नये यासाठी अनेक पोलीस अधिकार्यांनी प्रयत्न केले, मात्र पिंपळनेर पोलीस ठाण्याचे ठाणेप्रमुख कैलास भारती यांनी अवघ्या तुटपुंज्या पोलीस बळावर सत्तर गावात शांतता प्रस्थापीत करण्यात आणि उपोषणासह रस्ता रोको यासह अन्य आंदोलनात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापीत करण्यात यश आल्याचे दिसून येते. त्यांच्या या कार्यपद्धतीवर परिसरातील सर्वसामान्य खुश असल्याचे दिसून येते.
पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पीआय कैलास भारती यांनी गेल्या आठ दिवसाच्या कालखंडामध्ये पिंपळनेरसह परिसरातील सत्तर ते ऐंशी गावांमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात या मिळविले. पिंपळनेर, सांडरवणफाटा, गुंधा, घाटसावळी, ढेकणमोहा यासह अन्य गावांमध्ये उपोेषणे सुरू होती, अनेक गावांमध्ये पुढार्यांना गावबंदी करण्यात आली होती. आंदोलन जसे जसे तीव्र होत होते तसे तसे या भागातील मराठा समाजाचे आंदोलक अधिक तीव्रतेने रस्त्यावर उतरत होते. आंदोलकांच्या हातून अनुचीत प्रकार घडू नये, सर्वसामान्यांना याचा त्रास होऊ नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी कैलास भारती हे स्वत: होऊन आंदोलकांसोबत चर्चा करत राहायचे. गेल्या आठ दिवसांच्या कालखंडात भारती यांनी आमरण उपोषणास बसलेल्या आठ ते दहा जणांचे मनपरिवर्तन करत आमरण उपोषण साखळी उपोषणात बदलले. पिंपळनेर, गुंधा यासह अन्य उपोषणकर्त्यांना त्यांनी विश्वासात घेऊन या सर्व गोष्टी केल्या. रास्ता रोको दरम्यान आंदोलकांसोबत राहून अनुचीत प्रकार घडणार नाही, याची त्यांनी दक्षता घेतली. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत पिंपळनेर परिसरात कौतुक होत आहे.