ग्रा.पं. निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांसह समर्थकांचा विजयी उत्सव, पाटोद्यात वडझरीचे सानपांचे दोन्ही गट आमने-सामने, मारामारी, पोलिसांचा सौम्य लाठीमार; नेकनूरमध्ये मुंडे गटाचे नारायण शिंदेंची सरशी,परळीत तीन पैकी दोन ग्रा.पं.वर धनंजय मुंडेंचं वर्चस्व
बीड (रिपोर्टर):- बीड जिल्ह्यात 158 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान झाल्यानंतर आज जिल्ह्यातल्या तहसील कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली असता अनेक ठिकाणी सत्तापरिवर्तन तर बहुतांशी ठिकाणी मातब्बरांना शह देण्यात गाव कारभार्यांना यश आले. जिल्ह्यातील बहुतांशी भागात विजयी उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. मात्र पाटोदा तालुक्यातील वडझरी ग्रामपंचायतीचा निकाल लागल्यानंतर विजयी गट आणि पराभूत गट आमने-सामने आल्याने त्या ठिकाणी पाटोद्याच्या तहसील परिसरात रस्त्यावरच दोन गट भिडले आणि हाणामारी सुरू झाली. या वेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचे वृत्त आहे. याच दरम्यान गोळीबार झाल्याची अफवा पसरली होती. निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
सांगवी आष्टी सरपंच पदी संदीप खेडकर तर रुईनालकोल सरपंच पदी संध्या नालकोल विजयी
आष्टी ( रिपोर्टर):- तालुक्यातील 4 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया जाहिर झाली होती.यापैकी धिर्डी व कोयाळ ग्रामपंचायती बिनविरोध पार पडल्या तर उर्वरित रुईनालकोल व सांगवी आष्टी ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्य पदासाठी रविवारी दि.5 नोव्हेंबर रोजी चुरशीचे मतदान झाले यामध्ये आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे मा.आ.भिमरावजी धोंडे यांचे मुळ जन्मगाव असलेल्या रुईनालकोल ग्रामपंचायत च्या सरपंच पदी संध्या श्रीपती नालकोल यांचा 28 मतांनी दणदणीत विजय झाला.तर सांगवी आष्टी ग्रामपंचायत मध्ये आ.सुरेश धस गटाचे सरपंचपदाचे उमेदवार संदीप खेडकर यांचा 52 मतांनी दणदणीत विजयी झाले रुईनालकोल ग्रामपंचायत चे विजयी सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा मा.आ.भिमरावजी धोंडे यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या व आनंद भवन येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
धारूर तालुक्यातील 17
ग्रामपंचायतचा निकाल जाहीर
भाजप – 7 राष्ट्रवादी- 5 संमिश्र 5
किल्ले धारूर (रिपोर्टर) धारूर तालुक्यातील 17 ग्रामपंचायत यांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. धारूर तालुक्यात एकूण वीस ग्रामपंचायत साठी निवडणूक होणार होती यात दोन ग्रामपंचायत बिन विरोध काढण्यात आल्या होत्या. तर मोहखेड येथे सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली होती. यामुळे तालुक्यातील सतरा ग्रामपंचायत मध्ये सरळ सरळ लढत झाली यात सरपंच पदाची उमेदवार त्यांचे गावे पुढील प्रमाणे ,गोपाळपूर ग्रामपंचायत मधून सोनाली सोनवणे, मंदोदरी श्रीराम गडदे – मोरफळी, मीरा दयानंद भोसले शिंगणवाडी, गंगाबाई अंबुरे – चारदरी, सोनाली बालासाहेब अंडील – पहाडी पारगाव, विश्वनाथ तिडके- पिंपरवडा, गोपाळ कुकडे – कानपूर, चंद्रकला सचिन सुदे – भोगलवाडी, विलास शेंडगे – चिखली, योगेश सूर्यकांत सोळंके- हिगणी, मनीषा राहुल तोंडे सोनिमोहा, भागवत गव्हाणे- धूनकवड, बालासाहेब अश्रूबा सोहनेरकर – सुकळी, रुक्मीन सीताराम लिंगे – सुरनरवाडी , सत्यभामा आश्रम कांदे – कुंडी, हे सरपंच पदासाठी उमेदवार विजयी झालेले आहेत सर्वांनी निवडणूक झाल्यानंतर तहसील परिसरामध्ये एकच जल्लोष केला होता यात नवतरुणाईला मतदारांनी पसंती दिली आहे. अनेक प्रस्थापितांना या निवडणुकीमध्ये धक्का बसल्याचे समोर आले आहे.