राज्य सरकारचा नवीन नियम
बीड (रिपोर्टर) तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शेतकर्यांना बिनव्याजी आतापर्यंत देण्यात येत होते. पीक कर्ज घेतल्यानंतर घेतल्याच्या तारखेपासून बारा महिन्याच्या आत हे पीक कर्ज नुतनीकरण केल्यास त्याला राज्य सरकारच्या पंजाबराव देशमुख व्याज माफी सवलत योजनेअंतर्गत राज्य सरकार संबंधित शेतकर्यांचे व्याज भरत होते. मात्र राज्य सरकारने या नियमात बदल करत 31 मार्चच्या आत शेतकर्यांनी पीक कर्जाचे नुतनीकरण केल्यास त्याला व्याज माफी मिळणार आहे.
साधारणत: जुन-जुलैपासून शेतकर्यांना खरीपाच्या पिक कर्जाचे वाटप बँकेकडून करण्यात होते. हे खरीप पीककर्ज सप्टेंबर ते ऑक्टोबर अखेरपर्यंत शेतकर्यांना वाटप केले जाते. त्यानंतर ज्या तारखेला शेतकर्यांनी कर्ज घेतले आहे त्या तारखेनंतर बारा महिन्याच्या आत या शेतकर्यांनी तीन लाखांच्या आतील पीककर्ज नुतनीकरण केल्यास त्याला व्याज देण्यात येत होते मात्र यात राज्य सरकारने बदल करत पीक कर्ज कधीही घेऊ, मार्च एन्डच्या आतच या शेतकर्यांनी कर्जाचे नुतनीकरण केल्यास त्यांनी भरलेल्या व्याजाची रक्कम पंजाबराव देशमुख कृषी व्याज माफी सवलत योजनेअंतर्गत त्याच्या खात्यावर सहकार विभागामार्फत जाम करण्यात येत असे. मात्र यावर्षीपासून मार्च एन्डच्या नंतर कर्जाचे नुतनीकरण केल्यास या शेतकर्यांना साडे बारा टक्के या मोठ्या व्याजदराने पीक कर्जाची रक्कम बँकेला भरणा करावी लागणार आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये नाराजी आहे.
यावर्षी 48 टक्के पीक कर्जाचे वाटप
या आर्थिक वर्षामध्ये राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकेकडून खरीप आणि रब्बीचे 2200 कोटी रुपयांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 30 जून 2022 अखेर 857.85 लाख इतके पीक कर्ज शेतकर्यांना वाटप करण्यात आले आहे. सरासरीच्या 48 टक्के इतके पीककर्जाचे उद्दिष्ट बँकांनी गाठले आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांनी रिपोर्टरला दिली आहे.