गणेश सावंत
राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेला बीड जिल्हा तसा मागास. परंतु राज्याच्या कानाकोपर्यात राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतीक, अथवा अन्य कुठल्याही क्षेत्रातील घटना घडली, की त्याचा थेट संबंध बीडशी येतो. अशा वेळी खलनिग्रणाय-सद्रक्षणायचे ब्रीद घेऊन सर्वसामान्य जनतेच्या आणि सामाजिक एकोप्याचे कवच असलेल्या पोलिसांकडे मोठी जबाबदारी येते. मात्र गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात बीड जिल्ह्यात पोलीस आहे की नाही ? बरं पोलीस आहे तर ती नेमकी काय करते? पोलीस कशासाठी असते? हे जे प्रश्न जनतेला पडले होते त्याचे उत्तर काल मिळाले. गुन्हे आर्थिक शाखेच्या पोलीस निरीक्षकाने थोडी थिडकी नव्हे तब्बल 1 कोटीची लाच मागितली अन् इथच बीडची पोलीस वेश्यालयाच्या दारात उभा ठाकल्याचे दिसून आले. ती बिचारी वेश्या पोटाची खळगी भरण्यासाठी देहविक्री करते, ती इमानदारीने. इथे मात्र इमानदारीलाच नागवं होऊन सेजेवर निजावं लागतं. तेव्हा अशा लाचखोर पोलीस यंत्रणेबाबत गुंड, मवाली, माफिया, दबून राहतील? पोलिसांचा आदर करतील, याचं आत्मपरिक्षण आता बीड पोलिसांनी करायलाच हवे. म्हणूनच आज दोन वर्षांच्या कालखंडातली बीड पोलिसांची कामगिरी आणि त्यांच्या लाचखोरीवर हा आमचा कटाक्ष….
राज्यात जे होत नाही ते बीडमध्ये होते, राज्यात जे मिळत नाही ते बीडमध्ये मिळते. बीड एक भयान वास्तव असे अधिकारीही लिहतात. अधिकार्यांमध्ये बीड हे चांगले नाही, असेही बोलले जाते. इथे अधिकारी, कर्मचारी नोकरी करण्यासाठी धजत नाहीत, भीतात. अशी जिल्ह्याची बदनामी केली जाते मात्र बीडमध्ये आलेला अधिकारी पुन्हा बीडमधून जाण्याचे नाव घेत नाही. अशा वेळी बीड चांगले की वाईट? हा प्रश्न आम्ही जाणीवपुर्वक बीडला नाव ठेवत बीडमध्ये लाचखोरी करणार्या अधिकार्यांना विचारू. गेल्या दीड-दोन वर्षापूर्वी बीड जिल्ह्यात नंदकुमार ठाकूर यांची वर्दी झाली. त्यांनी जिल्ह्याचे सुत्र हाती घेतले. तेव्हा या अधिकार्याच्या कार्यकाळात गुंड माफिया, अवैध धंदेवाल्यांची दुकाने बंद होतील, बीडचे नंदनवन होईल, असे वाटले होते. मात्र दुर्दैव नंदकुमार ठाकुरांच्या कार्यकाळातच बीड जिल्ह्यात अवैध धंदे फोपावले. वेगवेगळ्या क्षेत्रातले माफिये एकप्रकारे डॉन होऊ पाहू लागले. मग वाळू माफिया असोत, गुटखा माफिया असोत, चंदन तस्कर असोत अथवा मटका आणि क्लब असो. हे सर्व धंदे बिनबोभाट चालू राहिले. कुठे व्हाईट कॉलरवाले धंद्यात मिसळले, तर कुठे पोलीस वाल्यांनीच वाळुचे हायवे खरेदी केले. जेव्हा अवैध धंदे तेजीत येतात, गली का गुंडा जेव्हा माफिया होतो तेव्हा भविष्यातील
सामाजिक एकोप्याला तडा
जाण्याची दाट शक्यता असते. हप्तेखोरीने लालचलेल्या वर्दीच्या मनगटात ते बळच राहत नाही. जिथे अन्याय होत असेल, जिथे अत्याचार होत असेल तिते काठी उगारायला आणि तेच झाले. पोलिसांचा वचक संपला, तो हप्तेखोरी आणि लाचखोरीमुळे. मग काय, अवैध धंदेवाल्यांसाठी, माफिया, तस्करांसाठी जिल्ह्याच्या सीमा खुल्या झाल्या, तिथे अवैध धंद्यातून माफिये सामाजिक तेढात उतरले. सामाजिक तेढातले माफिये मग ते सत्ताकारणातले असतील, राजकारणातले असतील अथवा समाजकारणातून राजकारण, सत्ताकारणात जाऊ पाहणारे इच्छावर्धकही असतील. बीड अस्थिर होत राहिले, एका आंदोलनाला हिंसक वळण लागले, आमदार, खासदरांचे घरं जाळले, पोलीस हात बांधून नुसते बघत राहिले, तेव्हापासूनच बीड पोलिसांवरचा आणि जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकुरांवरचा विश्वास जिल्हावासियांचा उडाला. चुक करणारे ‘देर आये दुरुस्त आये’ पद्धतीने काम करतील. पुन्हा एकदा जिल्ह्यावर खाकीचा वचक निर्माण करतील, असे वाटत असतान निवडणुका आल्या आणि निवडणुकांमध्येही पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. यातून बीड पोलीस केवळ लाचखोरीसाठी आणि हप्तेखोरीसाठीच आहे, अशी स्पष्ट प्रतिक्रिया बीड जिल्ह्यातील जनता देऊ लागली. दुर्दैव याचं वाटतं, बीड जिल्ह्यात
लाखो कुटुंबियांना बँकांनी उद्ध्वस्त केलं
गेल्या दोन वर्षांच्या कालखंडात एक नव्हे दोन नव्हे, पाच-पाच-सात-सात मल्टिस्टेट, बँका अक्षरश: हजारो कोटी रुपये घेऊन पळून गेल्या. जिल्हाभरातला लाखाच्या वर असलेला ठेवीदार आर्थिकदृष्ट्या या लोकांनी नागवा केला. अनेक मल्टिस्टेट आणि त्यांच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र बीड पोलीस अथवा ज्या अधिकार्यांकडे याचा तपास देण्यात आला, तो तपास घटनेतल्या गांभीर्यातून जेवढ्या जलदगतीने व्हायला हवा तेवढ्या जलदगतीने झालाच नाही. फरारी आरोपींना अद्यापही पोलिसांना अटक करता आलीच नाही. हमाम मे सब नंगे असल्यागत पोलीस यंत्रणेसह जिल्हा प्रशासन हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराकडे गपगुमान बघत राहिले. परंतु पोलिसांकडून तपास का होत नाही याचे उत्तर काल मिळाले. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरीभाऊ खाडे यांनी एका मल्टिस्टेट प्रकरणातून सहीसलामत बाहेर काढण्यासाठी हजार-पाचशेची नव्हे एक कोटीची लाच मागितली. तिथे तडजोड झाली आणि 30 लाखांच्या तडजोडीत पाच लाखाची रक्कम हरिदास खाडेंच्या नावे एका व्यापार्याकडे जमा झाली. लाचलूचपत प्रॠतिबंधक खात्याच्या अधिकार्यांनी ती रक्कम रंगेहात पकडून खाडेंसह अन्य एकावर गुन्हा दाखल केला. यातून हे स्पष्ट झाले, मल्टिस्टेट मधल्या हजारो कोटी रुपयांचे प्रकरण बीड पोलिसांनी गंभीर घेतले नाही. ते गंभीर घेतले ते केवळ स्वत:च्या हप्तेखोरी आणि लाचखोरीसाठीच. पोलिसांचे हे वर्तन एखाद्या वेश्यालयातल्या बाजारात स्मित हास्य करत लुभावणारं अशी जळजळीत प्रतिक्रिया जेव्हा लोकांतून येते तेव्हा खाकी खरच डागाळते ओ.