आष्टी (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी आष्टी मतदारसंघात महायुतीतल्या मित्रपक्षात फूट पडत याठिकाणी मैत्रीपुर्ण लढती होत असल्याने आष्टी-पाटोदा-शिरूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व कोण करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. माजी मंत्री सुरेश धस हे महायुतीकडून रिंगणात आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनी पक्षाच्या सिम्बॉलवर निवडणूक लढण्याचे ठरवत महायुतीच्या उमेदवाराला अडचण निर्माण केली. तिकडे भाजपाचे भीमराव धोंडे हेही बंडखोरी करत निवडणुकीच्या आखाड्यात उतरले. तर महाआघाडीकडून शेख महेबूब हे रिंगणात असल्याने इथे चौरंगी लढत होत आहे. मराठा, ओबीसी, मुस्लिम आणि दलित मतांवर या चौघांचे लक्ष असून मतांच्या ध्रुवीकरणात जो यशस्वी होईल तो उमेदवार याठिकाणी निर्णायक असेल, असे सांगितले जात असले तरी मतांच्या ध्रुवीकरणावर विजयाचा एक्का कोण असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आष्टी विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीतील तिघे उमेदवारीसाठी इच्छूक होते. धस-धोंडे-आजबे या तिघांनीही या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले आहे. त्यामुळे इथे कोणाला उमेदवारी दिली जाणार यावर चर्चा होत असताना सुरेश धसांनी होऊन जाऊ द्या, कोणात किती ताकद आहे हे पहाता येईल, सर्वांना स्वतंत्र लढण्यासाठी पक्षांनीच परवानगी द्यावी, असे म्हटले होते. त्यामुळे इथे महायुतीत तिन उमेदवार निवडणूक रिंगणात आले. महायुतीचे अधिकृत उमेदवार हे भाजपाचे सुरेश धस आहे तर विद्यमान आमदार बाळासाहेब आजबेंना अजित पवारांच्या राष्ट्रवादीने घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढण्यास परवानगी दिली आहे. तिकडे तुतारीतून शेख महेबूब हा नवखा उमेदवार रिंगणात आलेला आहे. ही निवडणूक विकासापेक्षा मताच्या ध्रुवीकरणाबरोबर जातीच्या समीकरणावर अधिकपणे असणार आहे. मराठा आरक्षणाचा प्रभाव त्याचबरोबर ओबीसी मतांचे एकीकरण या निवडणुकीमध्ये अनन्यसाधारण महत्व प्राप्त करून सोडणारे आहे. मतदारसंघात या चार प्रमुख उमेदवारांसह 17 उमेदवार रिंगणात आहेत. मराठा, ओबीसी या मतांबरोबर मुस्लीम आणि दलित मताला आष्टी मतदारसंघात चांगलेच महत्व प्राप्त होणार आहे. भाजपाचे धस-धोंडे पुन्हा एकदा एकमेकांविरोधात आहेत आणि महायुतीतील मित्र पक्षांचे आजबेही निवडणूक रिंगणात असल्याने वरवर ही निवडणूक महाविकास आघाडीच्या शेख महेबूबसाठी सोपी वाटत असली तरी धसांसारखा मुरब्बी, चाणाक्ष्य आणि त्यांच्या पाठिशी असलेली पंकजा मुंडेंची ताकद या निवडणुकीला धसांना मजबूत करणारी ठरेल. भीमराव धोंडे हेही परिणामकारक उमेदवार आणि नेतृत्व आहे. तर आजबे हे विद्यमान असल्याने त्यांचेही बळ तेवढेच. एकूणच आष्टीमध्ये ज्याला मताचं ध्रुवीकरण करता येईल त्याला विजयी मार्गावर चालता येईल.