अखंड हिंदुस्तानाच्या राजकीय सारीपाटावर महाराष्ट्र राज्याला अनन्यसाधारण महत्व आहे. देशाची आर्थिक नाडी याच महाराष्ट्राच्या हातात आहे. जगभरात आणि देशभरात अनेक देशांना आणि राज्यांना नुसता भुगोल आहे, मात्र या महाराष्ट्राला इतिहासाची देण आहे त्यामुळे समाजकारणाबरोबर राजकारणातही हे राज्य अग्रेसर आहे. दिल्ली तक्त केव्हा, कुठे आणि कसं हलवायचं, दिल्ली तक्ताला सामोरे कसं जायचं, याचं ज्ञान चांगल्या प्रकारे महाराष्ट्राला आहे. म्हणून इतिहास साक्षीला आहे. जेव्हा केव्हा दिल्ली तक्त अडचणीत आलं तेव्हा तेव्हा हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून गेला. आज त्याच महाराष्ट्रात एक राजकीय आखाडा सुरू आहे. त्या आखाड्यात एकतर्फी मल्ल उतरलेले दिसतायत. इथे एकतर्फीच लढाई असल्याने कुणी तेल लावून नक्कीच आलेले नाही. कारण तेल लावलेल्या पहेलवानाला निवडणुकीत जनतेने निपचीत पाडले आहे. आता खेळ चालू आहे कधी छाती फुगवण्याचा तर कधी दंडाच्या बेंडकुळ्या दाखवण्याचा. या खेळात महाराष्ट्राच्या दाढीवाल्याला जेवढे महत्व प्राप्त झालेले आहे तेवढेच महत्व
दिल्लीची दाढी
ला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून पंधरवाडा उलटत चाललाय तरी दिल्लीची दाढी आणि महाराष्ट्राची दाढी एक होताना दिसून येत नाही. महाराष्ट्राच्या दाढीने अडीच वर्षापुर्वी जो काही खेळ मांडला अन् त्या खेळातून स्वत:च्या पक्षाबरोबर राष्ट्र रंगवला, त्याचं नक्कीच कौडकौतुक होतय. परंतु जेव्हा सत्ताकारणाचा विषय येतो, सत्ताकारणाची सेज सजवली जाते तेव्हा त्या सजवलेल्या सेजेवर कोणी निजावं यासाठी नक्कीच भांडण होतं. तेच भांडण सध्या महाराष्ट्राच्या वर्षावर सजवलेल्या सेजेबाबत होताना दिसतय. 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान झाले. या मतदानाची मतमोजणी 23 नोव्हेंबरला जेव्हा झाली तेव्हा भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अनाकालनीय आणि अघोरी यश मिळालं. आता एक तृतियांश जागेच्या बळावर दुसर्याच दिवशी महाराष्ट्रात सत्ता स्थापन होईल, असे कुणालाही वाटणे साहजिक. परंतु शिंदे गटाचे संजय शिरसाट म्हणतात तसे, ठाण्याच्या दाढीला हलक्यात घेऊ नका, त्यांच्या या इशार्यावरून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पार्टीत मुख्यमंत्रीसह अन्य मंत्री पदावरून तू तू मै मै आहे. मात्र 2014 पासून ज्या दिल्लीच्या दाढीने उभ्या देशाला पिंंगा घालायला लावलाय ते दाढीवाले अमितकाका अजूनही महाराष्ट्राच्या या सत्तास्थापन विषयावर जालीम उपाय काढू शकले नाहीत. मात्र या
दोन दाढ्या
महाराष्ट्राचच नव्हे तर देशाचं लक्ष स्वत:कडे वळवू पहात आहेत. अमित शहा यांची राजकीय कार्यपद्धत ही सर्वश्रूत आहे. पोटातलं पाणीही हलू न देता अमित शहा ज्या पद्धतीने धूर्त राजकीय डाव टाकतात त्या डावात सहाजीकच त्यांना हवं ते सावज अडकतं. देशाचे गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचा जेवढा दबदबा नाही तेवढा दबदबा चुकीच्या पद्धतीला बरोबरीच्या कार्यपद्धतीत आणून ठेवण्यात आहे. म्हणूनच निकाल लागून पंधरा दिवस उलटले तरी महाराष्ट्राला सत्तास्थापन करता येत नाही, यावर नक्कीच दिल्लीच्या दाढीने त्याच्यावर उपाय शोधला असेल म्हणूनच ठाण्याची दाढी दोन दिवसांपूर्वी आपल्या गावी गेल्यानंतर ती परतली आणि भाजपाला हवं तसं त्यांनी करावं, आमचा कुठलाही अट्टाहास नाही, असं माध्यमांसमोर मांडलं खरं परंतु ज्या पद्धतीने भाजपाने स्वत:कडे मुख्यमंत्री पद घेतलं, त्या पद्धतीनेच स्वत:कडे गृहमंत्रीपदही राखून ठेवलं. आता दिल्लीच्या दाढीने आपला खेळ तर खेळला. तसा गृहमंत्रीपदासाठी ठाण्याची दाढीही आपला सारीपाट महाराष्ट्राच्या पटलावर ठेवत बुद्धीबळातला कुठला प्यादा ते समोर करतात आणि सोंगड्या टाकून कुठला डाव टाकतात हे लक्षवेधकच असेल. मात्र या
दाढीवाल्याच्या खेळात
पंधरा दिवसांपासून वर्षा’ला पती नाही आणि महाराष्ट्राला सखा नाही, सोबती नाही. ज्या ताकतीने भाजप, सेना आणि राष्ट्रवादीने निवडणूक लढवली तेवढ्या ताकतीने त्यांचे आमदारही निवडून आले, त्याच उत्साहने खरंतर राज्यात सरकार स्थापन व्हायला हवे होते, मात्र गेली आठ -दहा दिवस झाले हा महाराष्ट्र काळजीवाहूच्या हातात आपल्याला पहायला मिळतोय. एकंदरीत आज आमचे कटाक्ष हे ठाणे आणि दिल्लीच्या दाढीवर खिळले आहे. कारण या दोन दाढींचा खेळ असा कघाही रंगलाय, की त्याचा भंग दिल्लीची दाढी करतेय की ठाण्याची दाढी करतेय, याकडे सर्वांचे लक्ष आहे, परंतु दाढीवाल्यांनी आता खेळात रंगण्यापेक्षा महाराष्ट्रात सत्ता स्थापन करावी, आणि महाराष्ट्राने दिलेल्या भरघोस दानाची परतफेड आपल्या कर्तृत्व-कर्मातून करून द्यावी.