नागपूर (रिपोर्टर): बीड जिल्ह्यातील जिजाऊ मल्टिस्टेट, ज्ञानराधा मल्टिस्टेट, मातोश्री मल्टिस्टेट, मराठवाडा अर्बन, माजलगाव मल्टिस्टेट, को-ऑपरेटिव्ह बँकांतील गैरव्यवहाराबाबत आज आमदार सुरेश धस अधिवेशनात आक्रमक झाले. ते म्हणाले, या सर्व मल्टिस्टेट अर्बन बँकांमध्ये जिल्ह्यामधील लोकांचे पाच हजार कोटी अडकले आहेत. केवळ दोन संस्थांमध्ये 16 हजारापेक्षा जास्त लोकांचे पैसे अडकले असून अनेक मुलींचे लग्न लांबले आहेत. आतापर्यंत 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या सर्वांचे पैसे लवकरात लवकर मिळावेत, अशी अपेक्षा करत ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या अध्यक्षाच्या बायकोला 36 बॉडीगार्ड होते, एवढे अंगरक्षक मलाही नसल्याची टिपणी त्यांनी यावेळी केली.
ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये 3 हजार 700 कोटी रुपये अडकले आहेत. यांच्या संचालकाच्या पत्नीला 36 बॉडीगार्ड होते, मलाही इतके बॉडीगार्ड नाहीत. यासंदर्भात 5 हजार 500 कोटी रुपयांच्या ठेवी मिळायला पाहिजे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यासंदर्भात मुंबईत बैठक लावण्याचे आश्वासन दिले आहे. ज्ञानराधा मल्टिस्टेटच्या संचालकांची संपत्ती जप्त केली पाहिजे. हा संघटित गु्न्हेगारीतील मोठा प्रकार आहे. त्यामुळे या प्रकरणातली आरोपांनी मकोका लावावा, अशी मागणी सुरेश धस यांनी केली. बीड जिल्ह्यातील एडीआर आणि डीडीआर , जिथे शाखा उघडल्यात तेथील एआर यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे मी करणार आहे. असं म्हणत धसांनी मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेचा विषय समोर मांडत ही योजना आमच्यासाठी महत्वाची होती, मात्र तिला कट मारण्यात आला. ही योजना आरोपीच्या पिंजर्यात ठेवली. या योजनेचे बोर्या वाजविण्याचे काम तत्कालीन सरकारने केले. असेही ते या वेळी म्हणाले.